मोदींचा सुधारणा अजेंडा डावावर
By Admin | Updated: November 9, 2015 00:47 IST2015-11-09T00:47:13+5:302015-11-09T00:47:13+5:30
संसदेचे हिवाळी अधिवेशन केवळ वादळीच ठरणार नाही तर राष्ट्रीयस्तरावर भाजपविरोधी शक्ती एकजूट होण्याचे संकेतही बिहारमधील नितीश-लालू-राहुल त्रयींच्या विजयाने मिळाले आहेत.

मोदींचा सुधारणा अजेंडा डावावर
हरीश गुप्ता, नवी दिल्ली
संसदेचे हिवाळी अधिवेशन केवळ वादळीच ठरणार नाही तर राष्ट्रीयस्तरावर भाजपविरोधी शक्ती एकजूट होण्याचे संकेतही बिहारमधील नितीश-लालू-राहुल त्रयींच्या विजयाने मिळाले आहेत.
राजकीय इतिहासाची दिशा बदलणार असे नितीशकुमार आणि लालूप्रसाद यादव यांनी पाटण्यातील संयुक्त पत्रपरिषदेत विजयीमुद्रेने ठामपणे सांगितले आहे. दिल्लीत राहुल गांधी यांनीही त्याला दुजोरा दिला. लालूप्रसाद यादव यांनी एक पाऊल पुढे जात येत्या १० दिवसांत वाराणशीला जाऊन ‘मोदी हटाव’ मोहीम छेडणार असल्याचे जाहीर केले. संसदेत आणि संसदेबाहेर भाजपविरुद्ध प्रचारासाठी समविचारी पक्षांशी चर्चा करण्याची जबाबदारी जेडीयूचे अध्यक्ष शरद यादव यांच्यावर सोपविण्यात आली आहे. डावे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष, बसपा आणि अन्य छोट्या पक्षांचा महाआघाडीत समावेश नसला तरी त्यांना राष्ट्रीयस्तरावर आणि संसदेत एकत्र आणण्याचे प्रयत्न होणार आहेत. संसदेत मोदी सरकारला घेरण्याची एकही संधी सोडली जाऊ नये हीच विरोधकांची रणनीती असेल.
आसाम, प. बंगाल, केरळ, तामिळनाडू या राज्यांमध्ये पुढील १२ महिन्यांमध्ये विधानसभा निवडणुका असून त्यावेळी विरोधकांनी एकजुटीने सामना करावा, असे स्पष्ट संकेतही देण्यात आले आहेत.
‘थ्री डी’ने दिला भाजपला हादरा
डाळ, दलित आणि दादरी प्रकरण असे ‘थ्री डी’ भाजपला महागात पडले. डाळीचे भाव गगनाला भिडले असतानाच दादरी प्रकरणाची भर पडली. मांझींना भाजपने जाळ्यात ओढले, पण त्यांना महादलितांनी साथ दिली नाही. बाह्ण कारणांचा निपटारा करावा लागणार असे संकेत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिले आहेत. भाजपच्या शत्रूला भयाचे वातावरण तयार करण्यात यश आले.
दुसरीकडे भयाचे वातावरण संपविण्यात पक्षाला अपयश आल्याची कबुली सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनी दिली. काही बाह्ण घटकांमुळे व्यथित झालेल्या मोदींना संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळात खांदेपालट करता येणार नाही. येत्या चार दिवसांत ते विदेश दौऱ्यावर जात असून कुठलीही अडचण न आल्यास ते ब्रिटन आणि मलेशियातही जाहीर सभा घेतील. त्यामागे बिहारचे कारणही राहीलही, तथापि येत्या काळात राष्ट्रीय पातळीवर भाजपविरुद्ध होणाऱ्या विरोधकांच्या एकजुटीचे चित्र रंगतदार ठरू शकते, हे मात्र नक्की!
अडवाणींच्या वाढदिवशी निराशा...
रविवारी ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा साजरा झालेला ८८ वा वाढदिवस भाजपच्या पराभवाने झाकोळला गेला. भाजपचे ज्येष्ठ नेते त्यांच्या निवासस्थानी शुभेच्छा देण्यासाठी गेले तथापि तेथे एकूणच शुकशुकाट होता. त्यांच्या निवासस्थानी सर्वप्रथम जाणाऱ्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे होते. शत्रुघ्न सिन्हा, आर. के. सिंग यांच्यावरील शिस्तभंगाची कारवाईही आता लांबणीवर पडली आहे. भाजपच्या कंपूंवर कारवाई करण्याची मागणीही एका गटाकडून केली जाऊ शकते. बिहारमध्ये पराभव दृष्टिपथात पडताच भाजपच्या रणनीतीकारांनी पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या निवासस्थानी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
की फॅक्टर
काय ठरला?
पाटणा : बिहारमध्ये पराभवाचा झटका बसलेल्या भाजपला सरसंघचालक मोहन भागवत यांचे आरक्षणासंबंधी विधानही भोवले आहे. निवडणुकीचे वातावरण असतानाच भागवत यांनी आरक्षण धोरणाचा फेरविचार करण्याची गरज प्रतिपादित केली होती. महाआघाडीच्या नेत्यांनी या विधानाचा समाचार घेत भाजपविरोधी वातावरण तयार करण्यासाठी चांगला वापर केला. लालूप्रसाद व नितीशकुमार यांनी भागवत यांच्या आरक्षणासंबंधी विधानावर प्रतिक्रिया देताच भाजप-संघाने हल्लाबोल केला. त्यामुळे वातावरण पालटले. त्यानंतर संघ आणि भाजपच्या नेत्यांनी भागवत यांच्या विधानावर सारवासारख चालविली. मात्र, नुकसान रोखता आले नाही.महागाईबरोबरच मोदींपासून संघ- भाजपच्या नेत्यांनी केलेली बेछूट विधाने, मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर न करणे, मित्र पक्षांची नाराजी आणि नेत्यांनी कार्यकर्त्यांना दिलेली असहिष्णू वागणूक याचा मोठा फटकाही भाजपला बसला. केंद्रात मोदी सरकार आल्यापासून कागदोपत्री महागाई घटलेली असली तरीही कांद्यापाठोपाठ डाळींचे भावही २०० रुपये प्रतिकिलोपर्यंत गेले.
नितीश विजयाचे असेही ‘रहस्य’
पाटणा : नितीश कुमार, लालूप्रसाद यादव आणि काँग्रेस यांच्या महाआघाडीने स्पष्ट बहुमत मिळवले. त्यामागचा ‘मास्टर माइंड’ वेगळाच आहे. त्याचे नाव आहे प्रशांत किशोर. प्रशांत किशोर हे रणनीतीचे सौदागर म्हणून ओळखले जातात.
यापूर्वी लोकसभा निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्याच ‘मास्टर माइंड’नं पंतप्रधान मोदींच्या यशात मोलाची भूमिका बजावली होती. मोदींना गुजरातच्या गल्लीपासून ते राजधानी दिल्लीपर्यंत पोहोचविण्यात प्रशांत किशोर यांचा महत्त्वाचा रोल होता. याच प्रशांत किशोर यांनी बिहारच्या निवडणुकीत मात्र मोदींची साथ सोडून, नितीश कुमार यांना साथ दिली.
कोण आहेत प्रशांत किशोर?
३७ वर्षीय प्रशांत किशोर हे उत्तर प्रदेशच्या बलियाचे रहिवासी.
संयुक्त राष्ट्राच्या ‘हेल्थ मिशन’ दक्षिण आफ्रिकेतील प्रमुख म्हणून काम.
मोदींच्या प्रचारासाठी आफ्रिकेतील नोकरी सोडून आले होते.
देशातील राजकारण आणि निवडणुकांत काम करण्यासाठी सिटीझन्स फॉर अकाऊंटेबल गव्हर्नन्स अर्थात कॅग कंपनीची स्थापना.
या कंपनीद्वारे दिग्गजांच्या प्रचाराची धुरा हाती घेतली.
मोदींच्या सोशल मीडियाची संपूर्ण जबाबदारी प्रशांत किशोर यांच्याकडे.
‘अब की बार मोदी सरकार’ ही प्रशांत किशोर यांच्या टीमचीच घोषणा.
‘चाय पे चर्चा’ हा सर्वात गाजलेला उपक्रम.
आज भाजप संसदीय समितीची बैठक
नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी भाजप संसदीय समितीची बैठक होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी रविवारी दिलेल्या माहितीनुसार, बिहार निवडणुकीत अपेक्षेनुसार कामगिरी न करण्याच्या मुद्याशी संबंधित विविध पैलूंवर बैठकीत चर्चा होणे अपेक्षित आहे. यादरम्यान निवडणूक निकालांचे विश्लेषण आणि आत्मचिंतन करणे हे पक्ष नेतृत्वाचे काम असल्याचे भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रामकृपाल यादव म्हणाले.
द्विटबाजी
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि राजदप्रमुख लालूप्रसाद यादव यांना विजयाबद्दल मी शुभेच्छा दिल्या आहेत. भाजप या जनादेशाचा सन्मानपूर्वक स्वीकार करते. ‘बिहारला विकासाच्या नव्या मार्गावर नेण्यासाठी नव्या सरकारला आमच्या हार्दिक शुभेच्छा. आम्ही बिहारच्या लोकांनी दिलेल्या जनादेशाचा सन्मान करतो.
- अमित शहा, भाजपाध्यक्ष
बिहार विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयाबद्दल मी नितीशकुमार आणि लालूप्रसाद यादव यांचे अभिनंदन करतो,’ असे टिष्ट्वट शहा यांनी केले आहे.
नितीशकुमार यांनी शानदार हॅट्ट्रिक केली आहे. त्यांना शुभेच्छा. मला विश्वास आहे की, नितीशकुमार यांच्या नेतृत्वात बिहार प्रगतिपथावर जाईल आणि सुखीसंपन्न होईल.
-नवीन पटनायक,
मुख्यमंत्री, ओरिसा
हा देश निधर्मीवादी असल्याने येथे जातीयवादी शक्ती राज्य करू शकत नाहीत, हे स्पष्ट करून बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाने केंद्रातील सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे.
- सुशीलकुमार शिंदे, ज्येष्ठ नेते, काँग्रेस
बिहारी जनतेने देशाला नवी दिशा दाखवली. दिल्लीपाठोपाठ आता बिहारमध्ये भाजपचा दारुण पराभव झाला. देशात पसरलेली असहिष्णुता, धर्मावर आधारित राजकारण व खोटी आश्वासने यामुळे जनतेने भाजपला नाकारायला सुरुवात केली आहे. -खा. शरद पवार, राष्ट्रीय अध्यक्ष, राकाँ.
महाआघाडीचा विजय ही परिवर्तनाची नांदी आहे. बिहारच्या जनतेनेही मोदींच्या धोरणांना नाकारले आहे. दडपशाहीचे धोरण राबविण्याची मानसिकता दिसून आली. त्याविरुद्ध विचारवंतांमध्येच नव्हे, तर जनतेतही प्रचंड नाराजीचे वातावरण असल्याचे या निकालातून दिसून आले. -खा. अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस
हा जनादेश म्हणजे भाजप सरकारच्या लोकविरोधी धोरणांना चपराक आहे. हे सरकार केवळ द्वेषाचे राजकारण करण्यात व्यस्त राहिले. त्यामुळे समाजातील सर्व घटकांमध्ये भाजप सरकारबाबत संतापाची व फसवणुकीची भावना निर्माण झाली होती. हीच भावना लोकांनी व्यक्त केली. -राधाकृष्ण विखे-पाटील, विरोधी पक्षनेते, विधानसभा
प्रादेशिक अस्मिता, विकास आणि सामाजिक न्याय या त्रिसूत्रीवर आधारित राजकारणाचा हा विजय आहे. आता त्यांनी बिहारचा विकास इतक्या गतीने करावा की महाराष्ट्रात येणारे लोंढे थांबावेत. तसेच विकासाची दिशा अशी असावी की, बिहारमधून बाहेर गेलेले बिहारीही परत बिहारकडे यावेत. -राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे
भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली बिहारची निवडणूक लढविली. त्यामुळे बिहारमधील पराभव हा मोदींचा पराभव आहे, हे भाजपने मान्य करायला हवे. नितीशकुमार यांचे यश फार मोठे आहे. ते भारतीय राजकारणातील ‘महानायक’ ठरले आहेत. ते विजयी व्हावेत, असे बिहारी जनतेला वाटत होते आणि तसेच झाले.
- संजय राऊत, शिवसेना प्रवक्ते
महाराष्ट्रात अस्थिरता राहू नये म्हणून आम्ही नाइलाजाने महाराष्ट्रात भाजपसोबत सत्तेत आहोत; पण आज निवडणूक घेतली तर आम्ही बहुमताने जिंकू.
भाजपच्या जातीय राजकारणाला जनता दल परिवार पर्याय ठरू शकतो, हेच बिहारच्या निकालांनी सिद्ध झाले आहे. आता जनता परिवारातील पक्षांच्या एकीकरणाच्या प्रक्रियेला गती मिळेल. संघ परिवाराच्या जातीय राजकारणालाही निकालाने योग्य तो तडाखा बसला आहे.
-प्रा. शरद पाटील,
अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश जनता दल
मोदी ज्या गाडीच्या ड्रायव्हिंग सीटवर बसलेले आहेत ती गाडी गेल्या १८ महिन्यांपासून सुरूच झालेली नाही. मोदीजी जरा एक्सलेटर दाबा, गाडी पुढे न्या. असे केले नाही तर देशाची जनता तुम्हाला गाडीतून खेचून बाहेर फेकून देईल.’ विभाजनाच्या राजकारणाला कोणतेही स्थान नाही. बिहारचे निकाल संपूर्ण देशासाठी महत्त्वाचे आहेत.
- राहुल गांधी,
काँग्रेस उपाध्यक्ष
आम्ही जनतेच्या जनादेशासमक्ष नतमस्तक आहोत. हा लोकशाही आणि बिहारमधील जनतेचा विजय आहे. मी त्यांना सलाम करतो, ‘बिहारी विरुद्ध बाहरी’ हा मुद्दा आता कायमचा निकाली निघाला आहे. बिहारमधील निवडणूक हा लोकशाहीचा विजय आहे. बिहारच्या निवडणुकीतील विजयाबद्दल लालूप्रसाद यादव आणि नितीशकुमार यांचे अभिनंदन.
- शत्रुघ्न सिन्हा, भाजप नेते
बिहारने भाजपच्या ‘नापाक’ हेतूचा पर्दाफाश केला आहे आणि द्वेष, असत्य, अहंकार आणि विभाजनाचे राजकारण करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आरसा दाखविला आहे. ‘आता भाजपमध्ये मोदींविरुद्ध आवाज उठेल. आतापर्यंत नि:शब्द असलेले भाजपचे मार्गदर्शक मंडळ आता शांत बसणार नाही आणि मोदींना आव्हान देईल. - शकील अहमद,
काँग्रेस नेते
मोदी लाट आता ओसरली असून भारतातील जनतेचे खऱ्या अर्थाने अच्छे दिन आता सुरू झाले आहेत. आम्ही बिहारची जनता आणि महाआघाडीचे अभिनंदन करतो. अखेर जनतेचे अच्छे दिन सुरू झाले आहेत. मोदी लाट याआधीच दिल्लीत रोखली गेली आहे. काल केरळमध्ये आता बिहारमध्येही तिची वाटचाल पूर्णपणे थांबलेली आहे.
-सीताराम येच्युरी
माकप, नेते
मोदी लाटेला त्सुनामी असे संबोधले गेले. त्यामुळे देशात केवळ विध्वंस झाला आहे. २०१४ पासून भाजपने देशाच्या धर्मनिरपेक्ष लोकशाही रचनेविरुद्ध काम चालविले होते. अशा प्रकारच्या प्रचाराची बिहारात पुरती पीछेहाट झाली आहे, असेही ते म्हणाले.
बिहारमधील निवडणूक म्हणजे सहिष्णुतेचा विजय आणि असहिष्णुतेचा पराभव आहे. नितीशकुमार आणि लालूप्रसाद यादव यांचे अभिनंदन. मी नितीशकुमारजी, लालूजी आणि त्यांच्या पूर्ण चमूचे तसेच बिहारमधील सर्व बंधू-भगिनींचे अभिनंदन करते, बिहारमधील तिसऱ्या टप्प्याच्या निवडणुकीत त्यांनी जनतेला नितीशकुमार यांना समर्थन देण्याचे आवाहन केले होते. - ममता बॅनजी,
मुख्यमंत्री, प. बंगाल
बिहारच्या जनतेने द्वेष आणि असहिष्णुतेचे राजकारण करण्याच्या चेहऱ्यावर मारलेली ही चपराक आहे.हे केंद्र सरकारच्या कामगिरीचे सार्वमत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या कार्यशैलीविरुद्ध गेलेला हा निकाल आहे. बिहारचा निकाल ऐतिहासिक ठरतो.
- अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री, दिल्ली