नवी दिल्ली : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. सोमवारी (5 जानेवारी) जेएनयू कॅम्पसमध्ये झालेल्या एका आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्याविरोधात वादग्रस्त घोषणाबाजी करण्यात आली. या घोषणांमुळे राजकीय वातावरण तापले असून, भाजपने आंदोलकांवर तीव्र शब्दांत टीका केली आहे.
घोषणाबाजीचा व्हिडीओ व्हायरल
या आंदोलनाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये विद्यार्थ्यांनी हातात फलक, ढोलकी घेऊन सरकारविरोधात निदर्शने केल्याचे दिसते. यावेळी पंतप्रधान, गृहमंत्री आणि उद्योगपती अदानी यांच्याविरोधात आक्षेपार्ह घोषणांचे सूर ऐकू येतात. हे आंदोलन जेएनयू विद्यार्थी संघ (JNUSU) आणि डाव्या विचारसरणीच्या संघटनांनी आयोजित केल्याचे सांगितले जात आहे.
आंदोलनामागील दोन प्रमुख कारणे
पहिले कारण - 5 जानेवारी 2020 चा जेएनयू हल्ला
पाच वर्षांपूर्वी जेएनयू कॅम्पसमध्ये काही अज्ञात हल्लेखोरांनी विद्यार्थी आणि प्राध्यापकांवर हल्ला केला होता. या घटनेला यंदा सहा वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर जेएनयू शिक्षक संघ (JNUTA) आणि विद्यार्थी संघाने हा दिवस “क्रूर हल्ल्याची आठवण” म्हणून पाळला. हल्लेखोर अद्याप मोकाट असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. याच अनुषंगाने ‘गुरिल्ला ढाबा’ हा प्रतीकात्मक कार्यक्रमही घेण्यात आला.
दुसरे कारण - उमर खालिद व शरजील इमाम प्रकरण
दिल्ली दंगलीशी संबंधित प्रकरणात माजी जेएनयू विद्यार्थी उमर खालिद आणि शरजील इमाम यांच्या जामीन अर्जाला सुप्रीम कोर्टाने नकार दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी न्यायालयाच्या निर्णयाविरोधात निदर्शने केली. या निर्णयाला विद्यार्थ्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचा हल्ला असल्याचे म्हटले आहे.
भाजपचा जोरदार पलटवार
दरम्यान, या वादग्रस्त घोषणांवरुन भारतीय जनता पक्ष (भाजप) आक्रमक झाला आहे. भाजप प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी व्हिडीओ शेअर करत आंदोलकांवर देशविरोधी विचारसरणीला प्रोत्साहन देणारे असल्याचा आरोप केला. त्यांनी या आंदोलनाला विरोध नसून “भारतविरोधी मानसिकता” असल्याचे म्हटले.
दिल्ली सरकारमधील मंत्री कपिल मिश्रा यांनीही सोशल मीडिया मंच X वर तीव्र प्रतिक्रिया देत म्हटले की, सापांचे फण ठेचले जात आहेत, त्यामुळे त्यांची पिले विवळत आहेत. जेएनयूमध्ये नक्षलवाद्यांच्या आणि दंगेखोरांच्या समर्थनार्थ घोषणा देणारे हताश झाले असल्याचा आरोप त्यांनी केला.
दिल्ली पोलिसांची भूमिका
या प्रकरणी अद्याप दिल्ली पोलिसांकडे कोणतीही अधिकृत तक्रार दाखल झालेली नाही. मात्र, प्रकरण गंभीर होत असल्याने पोलिसांकडून स्वतःहून दखल घेतली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Web Summary : JNU faces backlash after students protest, chanting against Modi, Shah, and Adani. BJP condemns the anti-India sentiment following demonstrations commemorating a 2020 campus attack and supporting jailed students. Police may investigate.
Web Summary : जेएनयू में मोदी, शाह और अडानी के खिलाफ नारेबाजी से विवाद। भाजपा ने छात्रों के विरोध पर देशविरोधी भावनाएं भड़काने का आरोप लगाया। 2020 के हमले की बरसी और छात्रों के समर्थन में प्रदर्शन हुए। पुलिस जांच कर सकती है।