Modi government's big decision for sugarcane growers; Ethanol price incresed | ऊस उत्पादकांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय; शेतकऱ्यांसाठी दोन खूशखबरी

ऊस उत्पादकांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय; शेतकऱ्यांसाठी दोन खूशखबरी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळ आणि आर्थिक सुधारणा समितीच्या बैठकीत तीन मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. यापैकी दोन निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत. सर्वात मोठा दिलासा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिला आहे. इथेनॉलच्या किंमतीत 5 ते 8 टक्क्यांची वाढ करण्यात आल्याचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. 


उसापासून बनविण्यात येणाऱ्या इथेनॉलची किंमत 62.65 रुपये प्रति लीटर करण्यात आली आहे. आधी ही किंमत 59.48 रुपये प्रति लीटर होती. तर हेवी इथेनॉलची किंमत 57.61 रुपये प्रति लीटर करण्यात आली आहे. आधी ही किंमत 54.27 रुपये प्रति लीटर होती. याशिवाय 43.75 रुपये प्रति लीटर असलेल्या समुद्री हेवी इथेनॉलची किंमत 45.69 रुपये प्रति लीटर करण्यात आली आहे. या दरवाढीमुळे साखर कारख्यानांच्या हाती जास्त पैसे येणार आहेत. पेट्रोलमध्ये 10 टक्के इथेनॉल मिसळण्यात येणारा आहे. या इथेनॉलमुळे झिरो प्रदूषण होते. यामुळे हा निर्णय शेतकऱ्यांसह पर्यावरणासाठी फायद्याचे असणार आहे. 


तागाच्या म्हणजेच ज्यूटच्या उद्योगाला मदत करण्यासाठी सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. अन्न धान्याची 100 टक्के पॅकिंग आणि साखरेची 20 टक्के पॅकिंग ही तागाच्या गोण्यांमध्ये करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या बेठकीतील निर्णयाची माहिती जावडेकर यांनी दिली आहे. याचा फायदा ज्यूट उद्योगामध्ये काम करत असलेल्या चार लाख मजुरांना होणार आहे. तागाचे उत्पादन प्रामुख्याने पश्चिम बंगाल, ओडिशा, आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि आंध्र प्रदेशमध्ये घेतले जाते. 


तिसरा महत्वाचा निर्णय म्हणजे बंधारे पुनर्बांधणी आणि सुधारणा योजनेच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याला मंजुरी देण्यात आली. देशभरातील 736 बंधाऱ्यांची सुरक्षा आणि वापर नीट करण्यासाठी 10,211 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ही योजना एप्रिल 2021 ते मार्च 2031 पर्यंत राबविली जाणार आहे. 
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Modi government's big decision for sugarcane growers; Ethanol price incresed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.