मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 17:28 IST2025-11-05T17:27:48+5:302025-11-05T17:28:13+5:30
India Pakistan : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने अटारी सीमा आणि करतारपूर साहिब कॉरिडॉर बंद केले होते.

मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
India Pakistan : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने अटारी सीमा आणि करतारपूर साहिब कॉरिडॉर बंद केले होते. मात्र, आज गुरुनानक यांच्या 556व्या (जयंती) प्रकाश पर्वानिमित्त काही शीख भाविकांना पाकिस्तानात जाण्याची परवानगी देण्यात आली. परवानगी मिळाल्यानंतर मंगळवारी (4 नोव्हेंबर) भारतातील सुमारे 2,100 शीख भाविक वाघा सीमेमार्गे पाकिस्तानात दाखल झाले.
पाकिस्तानकडून स्वागत
वाघा चेक पोस्टवर पाकिस्तान शीख गुरुद्वारा प्रबंधक समितीचे अध्यक्ष आणि पंजाबचे अल्पसंख्याक व्यवहार मंत्री सरदार रमेश सिंग अरोरा, ETPB चे प्रमुख साजिद महमूद चौहान आणि धार्मिक स्थळ विभागाचे अतिरिक्त सचिव नासिर मुश्ताक यांनी भारतीय तीर्थयात्र्यांचे स्वागत केले.
पाकिस्तान सरकारने या उत्सवासाठी 2,150 भारतीय शिखांना व्हिसा जारी केला आहे. यामध्ये अकाल तख्तचे नेते ज्ञानी कुलदीप सिंह गरगज, शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीच्या बीबी गुरिंदर कौर, आणि दिल्ली गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे रविंदर सिंह स्वीटा यांचा समावेश आहे.
ETPB चे प्रवक्ते गुलाम मोहिउद्दीन यांनी सांगितले की, सुमारे 2,100 भाविक मंगळवारी लाहोरमध्ये पोहोचले. इमिग्रेशन आणि सीमाशुल्क प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर भाविकांना विशेष बसने गुरुद्वारा जन्मस्थान, ननकाना साहिब येथे नेण्यात आले. मुख्य कार्यक्रम आज (5 नोव्हेंबर) रोजी ननकाना साहिब येथे होणार आहे.
चोख सुरक्षा व्यवस्था
पाकिस्तान सरकारने गुरुद्वारा करतारपूर साहिब आणि ननकाना साहिब यांसह सर्व धार्मिक स्थळांची प्रकाशमय सजावट केली आहे. भाविकांच्या आरोग्य आणि सुरक्षेसाठी रेस्क्यू 1122 आणि ETPBच्या वैद्यकीय टीम्स सतत तैनात असतील. सर्व प्रवेशद्वारांवर आणि परिसरात फुलप्रूफ सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, रेंजर्स, पोलीस, विशेष दल आणि ETPBच्या सुरक्षा शाखा सतर्क आहेत.
10 दिवसांचा दौरा आणि धार्मिक कार्यक्रम
भाविक आपल्या 10 दिवसांच्या दौऱ्यात गुरुद्वारा पंजा साहिब (हसन अब्दाल), गुरुद्वारा सच्चा सौदा (फारुखाबाद) आणि गुरुद्वारा दरबार साहिब (करतारपूर) यांना भेट देतील. तसेच, 13 नोव्हेंबर रोजी परत भारतात परततील.