मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 21:36 IST2025-12-12T21:35:19+5:302025-12-12T21:36:02+5:30
मोदी सरकारने या योजनेचे केवळ नावच बदलले नाही, या योजनेच्या लाभातही वाढ केली आहे...

मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
केंद्र सरकारने शुक्रवारी (१२) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (मनरेगा - MGNREGA) योजनेचे नाव बदलले असून आता ही योजना 'पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना' नावाने ओळखली जाईल. माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्रिमंडळाने या योजनेचे नाव बदलण्यास आणि कामाचे दिवस वाढवण्यास मंजुरी दिली आहे.
१०० ऐवजी १२५ दिवसांच्या रोजगाराची हमी -
मोदी सरकारने या योजनेचे केवळ नावच बदलले नाही, या योजनेच्या लाभातही वाढ केली आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या कामाच्या दिवसांची संख्या आता १०० वरून वाढवून १२५ दिवस करण्यात आली आहे. अर्थात, आता ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला एका आर्थिक वर्षात १०० ऐवजी १२५ दिवसांच्या रोजगाराची हमी मिळणार आहे.
योजनेत १५ कोटींहून अधिक लोक सक्रिय -
मनरेगा ही यूपीए-१ (UPA-I) सरकारच्या प्रमुख योजनांपैकी एक असून, २००५ मध्ये सुरू करण्यात आली होती. ग्रामीण भागातील कुटुंबांना उपजीविकेची सुरक्षा पुरवणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. सध्या या योजनेत १५ कोटींहून अधिक लोक सक्रियपणे काम करत आहेत, यात सुमारे एक-तृतीयांश महिलांचा समावेश आहे.
सुरुवातीला या योजनेचे नाव राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा असे होते, यानंतर २००९ मध्ये या योजनेचे नाव बदलून 'महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना' असे करण्यात आले होते. आता या महत्त्वपूर्ण योजनेला 'पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना' म्हणून ओळखले जाईल आणि १२५ दिवसांच्या रोजगाराची हमी मिळेल.