'शून्य अपेक्षा'... EVMविरोधात निवडणूक आयोगाला भेटून राज ठाकरेंची निराशा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2019 13:52 IST2019-07-08T13:39:25+5:302019-07-08T13:52:10+5:30
नवी दिल्ली: ईव्हीएम हॅक होण्याची शक्यता असल्यानं आगामी निवडणुका मतपत्रिकेवर घ्या, अशी मागणी मनसेप्रमुख राज ठाकरेंनी केली. त्यासाठी त्यांनी ...

'शून्य अपेक्षा'... EVMविरोधात निवडणूक आयोगाला भेटून राज ठाकरेंची निराशा
नवी दिल्ली: ईव्हीएम हॅक होण्याची शक्यता असल्यानं आगामी निवडणुका मतपत्रिकेवर घ्या, अशी मागणी मनसेप्रमुख राज ठाकरेंनी केली. त्यासाठी त्यांनी निवडणूक आयोगाची भेटदेखील घेतली. गेल्या 20 वर्षांपासून ईव्हीएमवर शंका घेतली जात आहे. 2014च्या आधी भाजपानंदेखील ईव्हीएमबद्दल संशय उपस्थित केला होता. मात्र 2014 नंतर त्यांचा सूर बदलला, याकडे राज ठाकरेंनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
ईव्हीएमची चीप अमेरिकेतून येत असल्याची माहिती निवडणूक आयोगानं दिली. त्यामुळे ईव्हीएम हॅक करण्यात परकीय शक्तीचा हात असू शकतो, असं राज ठाकरेंनी म्हटलं. आगामी निवडणुका मतपत्रिकेवर घ्या. त्यामुळे मतदारानं कोणाला मतदान केलं आहे, हे त्याला समजेल, असं राज म्हणाले. मतपत्रिकेची मोजणी केल्यामुळे दोन दिवस उशिरा मतमोजणी पूर्ण होईल. मात्र ज्या देशात 2 महिने लोकसभेची निवडणूक चालते. त्यात आणखी 2 दिवसांची भर पडल्यास काय फरक पडणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
केवळ औपचारिकता म्हणून निवडणूक आयोगाला पत्र दिल्याचं राज यांनी सांगितलं. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहता त्यांच्याकडून अपेक्षा ठेवणं मूर्खपणाचं ठरेल. निवडणूक आयोगाला भेटलात का?, असं तुम्ही विचाराल म्हणून त्यांची (आयोगाची) भेट घेतल्याचं राज ठाकरे पत्रकारांना म्हणाले. महाराष्ट्रात गेल्यावर ईव्हीएमबद्दलची भूमिका ठरवू, असं राज यांनी सांगितलं. गेल्या ऑगस्ट महिन्यात सर्व राजकीय पक्षाच्या अध्यक्षांना यासाठी पत्र पाठवलं होतं. मात्र त्यावेळी कोणीही ऐकलं नाही. पण आता नक्की विचार करतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.