अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 23:13 IST2025-09-27T22:14:08+5:302025-09-27T23:13:48+5:30
तमिळनाडूमध्ये अभिनेता विजय याच्या रॅलीत झालेल्या चेंगराचेंगरीत अनेकांचा मृत्यू झाला.

अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
Karur Stampede: तामिळनाडूतील करूर येथे अभिनेता विजयच्या रॅलीत झालेल्या चेंगराचेंगरीत मृतांचा आकडा ३६ वर पोहोचला आहे. मृतांमध्ये सहा मुले, नऊ पुरुष आणि १६ महिलांचा समावेश आहे, असे तामिळनाडूच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. तर ४० हून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. तमिलगा वेट्टी कझगम प्रमुख आणि अभिनेता विजय यांनी नमक्कल येथे रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत ही भीषण घटना घडली.
तमिळनाडूमध्ये टीव्हीके प्रमुख अभिनेता विजय यांच्या करूर येथे झालेल्या रॅलीदरम्यान चेंगराचेंगरी झाली. अभिनेता-राजकारणी असलेल्या विजय यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झाली आणि अने लोक बेशुद्ध पडले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात दाखल केल्यानंतर अनेकांचा मृत्यू झाल्याचे समोर आलं. करूर द्रमुकचे आमदार आणि माजी मंत्री सेंथिल बालाजी यांनी धक्कादायक माहिती दिली..
"आतापर्यंत चेंगराचेंगरीत ३१ जणांचा मृत्यू झाला आहे आणि ५८ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर, मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब चौकशी केली आणि जिल्हाधिकाऱ्यांना, एसपींना आणि मला रुग्णालयात जाण्याचे आदेश दिले. आम्हाला अतिरिक्त डॉक्टरांना बोलावून योग्य उपचार देण्याचा सल्ला दिला. उद्या, मुख्यमंत्री स्वतः येथे येणार आहेत. सध्या ४६ जण खाजगी रुग्णालयात आहेत आणि १२ जण सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत," अशी माहिती सेंथिल बालाजी यांनी दिली.
विजय सभेला संबोधित करत असताना, गर्दी अनियंत्रित झाली आणि पक्षाचे कार्यकर्ते आणि काही मुले यांसह अनेक लोक बेशुद्ध पडले. पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांना परिस्थितीची जाणीव झाली आणि त्यांनी अलार्म वाजवला. विजयचे लक्ष जाताच त्यांने भाषण थांबवले आणि प्रचाराच्या बसमधून गर्दीला पाण्याच्या बाटल्या वाटण्याचा प्रयत्न केला. गर्दीच्या रस्त्यावरून रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचण्यास अडचणी येत होत्या. बेशुद्ध झालेल्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर मृतांचा आकडा वाढत गेला.
Karur, Tamil Nadu: Former Tamil Nadu Minister and DMK leader V Senthil Balaji says, "Till now, 31 people have died in the stampede and 58 people have been admitted to the hospital. After the stampede incident, the CM immediately enquired and ordered the district collector, SP,… pic.twitter.com/WSlvUPlCA4
— ANI (@ANI) September 27, 2025
या घटनेनंतर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी एक्स पोस्टवरुन यावर प्रतिक्रिया दिली. "करूर येथून मिळालेली माहिती चिंताजनक आहे. गर्दीत अडकलेल्या आणि बेशुद्ध पडलेल्या कोणालाही तात्काळ रुग्णालयात दाखल करावे आणि वैद्यकीय मदत करावी असे मी निर्देश दिले आहेत. मी या प्रकरणाबाबत माजी मंत्री सेंथिल बालाजी, मंत्री सुब्रमण्यम एम.ए. आणि जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो आहे. याव्यतिरिक्त, शेजारच्या तिरुचिरापल्ली जिल्ह्याचे मंत्री अनबिल महेश यांना तात्काळ मदत पुरवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. परिस्थिती लवकर नियंत्रणात आणण्यासाठी मी एडीजीपीशीही बोललो आहे. मी जनतेला डॉक्टर आणि पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करतो," असं मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन म्हणाले.