चमत्कार! खोल दरीत कोसळली कार, दोन दिवसांनंतर दोन प्रवासी सापडले जिवंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2018 12:29 IST2018-10-04T12:29:07+5:302018-10-04T12:29:54+5:30
देव तारी त्याला कोण मारी अशी म्हण आहे. या म्हणीचा प्रत्यय एका भीषण अपघातादरम्यान आला.

चमत्कार! खोल दरीत कोसळली कार, दोन दिवसांनंतर दोन प्रवासी सापडले जिवंत
उटी - देव तारी त्याला कोण मारी अशी म्हण आहे. या म्हणीचा प्रत्यय नुकत्यात उटी येथे झालेल्या एका भीषण अपघातादरम्यान आला. दोन दिवसांपूर्वी तामिळनाडूतील उटी-कलहट्टी मार्गावर चेन्नईतील पर्यटकांच्या कारला अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. मात्र या अपघातात सापडलेल्या दोन पर्यटकांना आश्चर्यकारकरीत्या वाचवण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, चेन्नईतील सात पर्यटक 30 सप्टेंबर रोजी उटी येथील हॉटेलवर आले होते. तेथून 1 ऑक्टोबर रोजी ते मसीनागुडीच्या दिशेने निघाले. वाटेत त्यांच्या कारला अपघात होऊन ती 60 फूट खोल दरीत पडली. हे पर्यटक परतून न आल्याने हॉटेल प्रशासनाने याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी राबवलेल्या शोधमोहिमेदरम्यान त्यांची कार उटी-कलहट्टी मार्गावरील घाटातील दरीत कोसळलेल्या स्थितीत सापडली.
या भीषण अपघातात कारमधून प्रवास करत अलेल्या सात जणांपैकी पाच जणांचा मृत्यू झाला होता. तर दोघेजण कारमध्ये अडकले होते. मृतदेहांमध्ये अडकल्याने त्यांना बाहेर येणे शक्य झाले नाही. दरम्यान, पोलिसांनी शोध घेऊन त्यांना बाहेर काढले आणि उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले. एवढ्या भीषण अपघातातही हे दोघेजण वाचल्याने पोलिसांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.