चमत्कार...! ISRO चं मिशन फेल झालं, पण १६ पैकी एक सॅटेलाईट जिवंत वाचला! अवकाशातून पाठवला सिग्नल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 08:30 IST2026-01-14T08:28:17+5:302026-01-14T08:30:30+5:30
ISRO PSLV-C62 Launch Spanish KID Capsule Satellite working : १२ जानेवारी रोजी इस्रोने PSLV-C62 रॉकेटचे प्रक्षेपण केले होते. या रॉकेटमध्ये भारताच्या DRDO चा एक मुख्य उपग्रह आणि इतर देशांचे १५ छोटे उपग्रह होते.

चमत्कार...! ISRO चं मिशन फेल झालं, पण १६ पैकी एक सॅटेलाईट जिवंत वाचला! अवकाशातून पाठवला सिग्नल
बेंगळुरू: भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच 'इस्रो'चे नवीन वर्षातील पहिलेच अभियान 'PSLV-C62' तांत्रिक बिघाडामुळे अपयशी ठरले. या अपघातात सर्व १६ उपग्रह नष्ट झाल्याची भीती व्यक्त केली जात असतानाच एक आश्चर्यकारक बातमी समोर आली आहे. स्पेनचा 'KID कॅप्सूल' नावाचा एक छोटा उपग्रह या भीषण अपघातातून सुखरूप बचावला असून त्याने अवकाशातून पृथ्वीवर संदेश पाठवण्यास सुरुवात केली आहे.
१२ जानेवारी रोजी इस्रोने PSLV-C62 रॉकेटचे प्रक्षेपण केले होते. या रॉकेटमध्ये भारताच्या DRDO चा एक मुख्य उपग्रह आणि इतर देशांचे १५ छोटे उपग्रह होते. मात्र, उड्डाणादरम्यान रॉकेटच्या तिसऱ्या टप्प्यात बिघाड झाला आणि उपग्रह त्यांच्या नियोजित कक्षेत पोहोचू शकले नाहीत. इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी ही मोहीम अयशस्वी झाल्याचे मान्य केले होते.
मृत्यूच्या जबड्यातून उपग्रहाची सुटका
स्पॅनिश कंपनी 'ऑर्बिटल पॅराडाइम' ने विकसित केलेला २५ किलोचा 'KID कॅप्सूल' हा उपग्रह फुटबॉलच्या आकाराचा आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, रॉकेटमध्ये बिघाड होऊन प्रचंड उष्णता आणि दाब निर्माण झाला असतानाही, हा कॅप्सूल रॉकेटपासून वेगळा होण्यात यशस्वी ठरला.
कंपनीने 'X' (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करत म्हटले की, "सर्व प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आमचा KID कॅप्सूल PSLV C62 पासून वेगळा झाला, सुरू झाला आणि त्याने डेटा पाठवण्यास सुरुवात केली. आम्ही सध्या त्याच्या मार्गाचा मागोवा घेत आहोत."
कसा वाचला...
हा कॅप्सूल विशेषतः अंतराळातून पुन्हा पृथ्वीवर येण्यासाठी डिझाइन करण्यात आला होता. दक्षिण प्रशांत महासागरात पडण्यापूर्वी त्याने भीषण उष्णता सहन करणे अपेक्षित होते. याच मजबूत बनावटीमुळे रॉकेट फेल झाल्यानंतरही तो नष्ट झाला नाही. सध्या हा उपग्रह अवकाशात सक्रिय असून शास्त्रज्ञ त्याच्याकडून मिळणाऱ्या माहितीचे विश्लेषण करत आहेत.