पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अड्डे उडवले. त्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यात लष्करी संघर्ष झाला. ऑपरेशन सिंदूरबद्दल लष्कर आणि सरकारने माहिती दिली. त्यात विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी काही प्रश्न उपस्थित करत परराष्ट्र सचिवांना घेरले. राहुल गांधींनी एस.जयशंकर यांच्यावर टीका केल्यानंतर भाजपने त्यांची तुलना थेट मीर जाफरशी केली आणि हे पोस्टर वॉर वाढलं.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ऑपरेशन सिंदूरवरून भाजप आणि काँग्रेसमध्येमध्ये सोशल मीडियावर राजकीय युद्ध छेडले गेले आहे. दोन्ही पक्ष आणि पक्षाचे नेते एकमेकांवर पोस्टरच्या माध्यमातून हल्ले करताना दिसत आहे.
अमित मालवीय यांची राहुल गांधींवर टीका
अमित मालवीय यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीरसोबत राहुल गांधींचा एक फोटो शेअर केला आणि म्हटले की, हे आश्चर्यकारक नाहीये का की, राहुल गांधी पाकिस्तानची भाषा बोलत आहेत. त्यांनी ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अभिनंदनही केलं नाही. उलट ते वारंवार हे विचारत आहेत की, किती लढाऊ विमाने गमावली आहेत. महत्त्वाचं म्हणजे या प्रश्नाचं उत्तर डीजीएमओच्या पत्रकार परिषदेत आधीच दिले गेले आहे"
त्यानंतर अमित मालवीय यांनी आणखी एक फोटो शेअर केला. ज्यात विरोधी पक्षनेते राहुल गांधींची तुलना मीर जाफर याच्याशी केली. 'राहुल गांधी हे आधुनिक काळातील मीर जाफर आहेत', असे ते म्हणाले.
काँग्रेसचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
अमित मालवीय यांनी राहुल गांधींचा फोटो पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांसोबत जोडल्याने काँग्रेसनेही तशाच पद्धतीने उत्तर दिल्याचे दिसले. बिहार काँग्रेसने पंतप्रधान मोदी आणि पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचा फोटो शेअर केला.
यात अर्धा चेहरा मोदींचा आहे, तर अर्धा चेहरा शरीफ यांचा आहे. हा फोटो शेअर करताना काँग्रेसने म्हटले आहे की, 'एक बिर्याणी देशावर भारी ठरली.'
काँग्रेस प्रवक्ते पवन खेरा यांनी परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांची तुलना जयचंदशी केली. त्यांनी एक कार्टून शेअर केले आहे, ज्यात एस. जयशंकर आणि पंतप्रधान मोदींना दाखवण्यात आले आहे. 'जयशंकर आधुनिक काळातील जयचंद आहेत का?', असा खोचक सवाल त्यांनी भाजपला केला.
काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनीही अमित मालवीय यांच्यावर पलटवार केला. खेरा म्हणाले, "पाकिस्तानची किती लढाऊ विमाने पाडण्यात आली आहेत, याबद्दल लष्कराने माहिती दिली आहे. त्याबद्दल आम्ही समाधानी आहोत. आमचा विश्वास नाहीये, तो भारताच्या राजकीय नेतृत्वावर. त्यांना उत्तर द्यावं लागेल की, ऑपरेशन सिंदूर कुणाच्या दबावामुळे अचानक थांबवण्यात आले?"