'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 18:29 IST2025-09-26T18:23:54+5:302025-09-26T18:29:56+5:30
नाटो प्रमुखांनी पंतप्रधान मोदी आणि पुतीन यांच्याबाबत केलेल्या दाव्यावर परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्टीकरण दिले.

'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
MEA on PM Modi-Putin Phone Call: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या वादग्रस्त निर्णयांमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी आधी भारतावर २५ टक्के कर लादला होता. नंतर रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे अतिरिक्त २५ टक्के कर लावला. त्यानंतर एच-१बी व्हिसाचे वार्षिक शुल्क वाढवण्यात आले. आता ट्रम्प यांनी औषधांच्या आयातीवर १०० टक्के कर लावण्याची घोषणा केली. दुसरीकडे ट्रम्पच नाही तर आता नाटो प्रमुखांनीही तेल खरेदीवरुन भारताबाबत धक्कादायक दावा केला. नाटो प्रमुखांनी केलेल्या विधानामुळे पाश्चिमात्य देश भारताला धमकावण्याचा प्रयत्न करत आहेत का असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र भारतानेही यावर प्रत्युत्तर दिलं.
डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला की त्यांनी भारत आणि पाकिस्तानमधील लष्करी संघर्ष रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र भारताने ट्रम्प यांचे दावे फेटाळून लावले. आता पाश्चात्य लष्करी संघटना नाटोचे सरचिटणीस मार्क रुट यांनी अमेरिकेने लादलेल्या करांमुळे भारताने रशियाला युक्रेन युद्धाबाबत आपली रणनीती स्पष्ट करण्यास सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विषयावर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी थेट चर्चा केल्याचेही मार्क रुट यांनी सांगितले.
आता रशियाचे अध्यक्ष पुतिन आणि पंतप्रधान मोदी यांच्यात युक्रेन-रशिया युद्धाबाबत चर्चा झाल्याचा नाटो प्रमुखांचा दावा भारताने स्पष्टपणे फेटाळून लावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याकडून युक्रेन योजना मागितल्याच्या नाटो प्रमुखांच्या दाव्याबाबत, परराष्ट्र मंत्रालयाने त्यांचे विधान चुकीचे आणि पूर्णपणे निराधार असल्याचे म्हटलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कधीही रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी नाटो प्रमुख मार्क रुट यांनी सुचवलेल्या पद्धतीने संवाद साधला नाही, असं परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले. परराष्ट्र मंत्रालयाने नाटो प्रमुखांच्या विधानावर कडक भूमिका घेत नाटोसारख्या महत्त्वाच्या संघटनेच्या नेतृत्वाने सार्वजनिक विधानांमध्ये अधिक जबाबदारी आणि अचूकता दाखवली पाहिजे असंही म्हटलं.
नाटो प्रमुखांनी काय म्हटलं?
दरम्यान, अमेरिकेने लादलेल्या शुल्कामुळे भारताने युक्रेन युद्धातील त्यांच्या रणनीतीबद्दल रशियाला स्पष्टीकरण मागितल्याचा दावा नाटोचे सरचिटणीस मार्क रुट यांनी गुरुवारी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विषयावर थेट रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी बोलल्याचाही दावा त्यांनी केला. न्यू यॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या वेळी सीएनएनशी बोलताना रुट म्हणाले की, "ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या शुल्काचा रशियावर मोठा परिणाम होत आहे. भारत पुतिन यांच्याशी फोनवर बोलत आहे आणि नरेंद्र मोदी त्यांना युक्रेनवरील त्यांच्या धोरणाबद्दल स्पष्टीकरण देण्यास सांगत आहेत कारण शुल्काचा भारतावर परिणाम होत आहे."