नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 20:23 IST2025-10-08T20:22:40+5:302025-10-08T20:23:42+5:30
Rammohan Naidu News: नवी मुंबई विमानतळाच्या उदघाटन सोहळ्यामध्ये नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस आदी नेते काय बोलतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा गाजवला तो नागरी हवाई वाहतून मंत्री राममोहन नायडू यांनी. तेलुगू भाषिक असलेल्या राममोहन नायडू यांनी उदघाटन सोहळ्याला उपस्थित असलेल्यांना चक्क मराठीतून संबोधित केले.

नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले...
नवी मुंबई परिसरात उभारण्यात आलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीयविमानतळाच्या टर्मिनल-१ चे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज झाले. त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाश शिंदे यांच्यासह अनेक नेते तिथे उपस्थित होते. या उदघाटन सोहळ्यामध्ये नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस आदी नेते काय बोलतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा गाजवला तो नागरी हवाई वाहतून मंत्री राममोहन नायडू यांनी. तेलुगू भाषिक असलेल्या राममोहन नायडू यांनी उदघाटन सोहळ्याला उपस्थित असलेल्यांना चक्क मराठीतून संबोधित केले.
राममोहन नायडू म्हणाले की, मी आंध्र प्रदेशमधील आहे. इथे सर्वांनी मराठीतून भाषण केलं. त्यामुळे मीसुद्धा मराठीतून दोन शब्द बोलण्याचा प्रयत्न करतो. जर माझ्याकडून काही चूक झाली तर मला माफ करा. भारताच्या कानाकोपऱ्यातून अनेक भारतीय आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी स्वप्ननगरी असलेल्या मुंबई शहरात येतात. तर अनेकजण इतर देशविदेशात जाण्यासाठी या शहरातून गरुड भरारी घेतात. या सर्वांच्या स्वप्नांना बळ देणाऱ्या एक अमूल्य भेटीचं आज लोकार्पण करण्यात येत आहे. याचा मला खूप आनंद आहे, असे राममोहन नायडू यांनी सांगितले.
दरम्यान, नवी मुंबई विमानतळावरून प्रत्यक्ष विमान वाहतूक नोव्हेंबरच्या मध्यात सुरू होणार आहे. पुढील पाच ते सात वर्षांतच मुंबईचे सध्याचे आंतरराष्ट्रीय विमानतळ दुय्यम ठरेल आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हेच महामुंबईचे मुख्य विमानतळ म्हणून जगाच्या नकाशावर ओळखले जाईल, असे तज्ज्ञांचे मत आहे. सध्या देशात सर्वाधिक उड्डाणे होणारे विमानतळ म्हणून दिल्लीचा पहिला क्रमांक आहे. तर, मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र, नवी मुंबई विमानतळामुळे हे चित्र लवकरच बदलण्याची शक्यता आहे.