जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 21:02 IST2025-10-15T21:01:14+5:302025-10-15T21:02:59+5:30
Jaipur Bus Fire: जयपूरच्या टोंक रोडवर सीटी ट्रान्सपोर्टच्या मिनीबसला अचानक आग लागली.

जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
जैसलमेर बस दुर्घटनेत अनेकांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना जयपूरच्या टोंक रोडवर सीटी ट्रान्सपोर्टच्या मिनीबसला अचानक आग लागली. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. सर्व प्रवाशांनी आपला जीव वाचवण्यासाठी खिडक्या आणि दरवाज्यांमधून उड्या मारल्या. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये व परिसरात मोठी घबराट पसरली. आगीची कारण अस्पष्ट असून पोलीस आणि वाहतूक विभागाने या घटनेचा तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, टोंक रोडवर जयपूर सिटी ट्रान्सपोर्ट सर्व्हिस लिमिटेडची मिनीबसच्या मागच्या बाजूने धूर निघाल्यानंतर काही मिनिटांतच आग लागली. चालकाने त्वरित बस रस्त्याच्या कडेला थांबवली आणि सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी आग आटोक्यात आणली. सुदैवाने, या घटनेत कोणत्याही प्रवाशांना गंभीर दुखापत झाली नाही.
प्रवाशांनी या घटनेनंतर सिटी ट्रान्सपोर्टच्या सेवेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, ही बस अत्यंत जुनी होती आणि तिची योग्य देखभाल करण्यात आली नव्हती. शहरात धावणाऱ्या अनेक मिनी बसेस जुन्या झाल्या आहेत आणि त्यांची देखभाल होत नाही, यामुळे अशा दुर्घटना वाढत आहे, असाही प्रवाशांनी आरोप केला.
पोलिसांनी आणि वाहतूक विभागाने या संपूर्ण घटनेचा तपास सुरू केला आहे. जळालेली बस रस्त्यावरून बाजूला काढल्यानंतर टोंक रोडवरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली. जयपूरमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील बसेसची देखभाल आणि सुरक्षितता यावर प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे, असे या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले.