चेन्नईत प्रवासी मजुरावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; चार अल्पवयीन आरोपी ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 16:23 IST2025-12-29T16:22:10+5:302025-12-29T16:23:37+5:30
एका आरोपीने या घटनेचा व्हिडिओ काढून व्हायरल केला.

चेन्नईत प्रवासी मजुरावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; चार अल्पवयीन आरोपी ताब्यात
चेन्नई : तमिळनाडूतील चेन्नई येथे एका प्रवासी मजुरावर चार अल्पवयीन युवकांनी अमानुष हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली असून, पोलिसांनी चारही आरोपींना ताब्यात घेतले आहे.
व्हिडीओतून उघडकीस आला हिंसाचार
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये चार युवक एका मजुराला बेदम मारहाण करताना स्पष्टपणे दिसतात. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींपैकी एकाने हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये आरोपी धारदार शस्त्राने मजुरावर हल्ला करताना दिसत असल्याचेही पोलिसांनी सांगितले. हल्ल्यात तो मोठ्या प्रमाणात रक्तबंबाळ झाल्याचे सांगण्यात येत आहे.
पीडित तरुण महाराष्ट्राचा, उपचार सुरू
हल्ल्यात गंभीर जखमी झालेला मजूर नेमका कुठल्या राज्यातील रहिवासी आहे, हे अद्याप समोर आले नाही. काही रिपोर्ट्समध्ये त्याला महाराष्ट्रातील, तर काहींमध्ये ओडिशातील असल्याचे सांगितले जात आहे. तो कामानिमित्त तमिळनाडूमध्ये वास्तव्यास होता. त्याच्यावर सध्या तिरुवल्लुर येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आरोपी अल्पवयीन, एकाचा गुन्हेगारी इतिहास
पोलिसांनी सांगितले की, चारही आरोपी अल्पवयीन आहेत. त्यापैकी तीन आरोपी चेंगलपट्टू जिल्ह्यातील, तर चौथा आरोपी यापूर्वी तुरुंगवास भोगलेला आहे. न्यायालयाने शिक्षणाचा आधार देत त्याला जामिनावर सोडले होते, अशी माहितीही समोर आली आहे.
घटनेवर राजकीय प्रतिक्रिया
या घटनेनंतर तमिळनाडूतील राजकारण तापले आहे. खासदार कार्ति चिदंबरम यांनी घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त करत पोलिसांशी फोनवर चर्चा केली. ते म्हणाले, “आता वेळ आली आहे की, पोलिसांनी कठोर कारवाई करून आपली ताकद दाखवावी. राज्यभर तातडीने विशेष मोहिमा राबवाव्यात, वाहन तपासणी व्हावी आणि सर्व हिस्ट्रीशीटर्सना आठवड्यातून तीन वेळा पोलिस ठाण्यात हजेरी लावणे बंधनकारक करावे.”
दरम्यान, विरोधी पक्षांनी सत्ताधारी DMK सरकारवर जोरदार टीका केली आहे. AIADMK नेते कोवई सत्यन यांनी म्हटले, “हा DMK च्या द्रविड मॉडेलचा परिणाम आहे. जेव्हा अल्पवयीनांच्या हातात ड्रग्स जातात, तेव्हा असेच घडते. तमिळनाडू नशेच्या पदार्थांचे केंद्र बनत आहे. या आरोपींना केवळ अल्पवयीन म्हणून पाहू नये.”
कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
या घटनेमुळे तमिळनाडूमधील प्रवासी मजुरांच्या सुरक्षिततेचा आणि वाढत्या गुन्हेगारीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, आरोपींविरोधात कडक कारवाई केली जाणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.