बापमाणूस! ४ वर्षे जमा केली १०-१० रुपयांची नाणी; चहावाल्याने लेकीचं स्वप्न केलं पूर्ण, घेतली स्कूटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 11:56 IST2025-11-11T11:55:22+5:302025-11-11T11:56:14+5:30
चहाची टपरी असलेल्या बच्चू चौधरी यांनी आपल्या लेकीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी चार वर्षांपासून १० रुपयांची नाणी जमा केली.

फोटो - आजतक
पश्चिम बंगालमधील मिदनापूर येथील चंद्रकोणा परिसरातून एक हृदयस्पर्शी गोष्ट समोर आली आहे, जी सोशल मीडियावर लाखो लोकांच्या मनाला भिडली आहे. मौला गावातील चहाची टपरी असलेल्या बच्चू चौधरी यांनी आपल्या लेकीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी चार वर्षांपासून १० रुपयांची नाणी जमा केली. शनिवारी, जेव्हा ते स्कूटी खरेदी करण्यासाठी नाण्यांनी भरलेला ड्रम घेऊन शोरूममध्ये पोहोचले तेव्हा उपस्थित असलेले सर्वजण हैराण झाले.
रिपोर्टनुसार, बच्चू चौधरी यांच्या मुलीने काही वर्षांपूर्वी स्कूटी खरेदी करण्याचा हट्ट केला होता. आर्थिक अडचणींमुळे ते तेव्हा आपल्या मुलीची इच्छा लगेच पूर्ण करू शकले नाहीत. परंतु त्यांनी एक दिवस त्यांच्या मुलीच्या चेहऱ्यावर हास्य आणण्याचा निर्धार केला होता. त्यांनी त्यांच्या चहाच्या टपरीवर एक रिकामा ड्रम ठेवला आणि दररोज त्यात १० रुपयांची नाणी टाकू लागले.
शोरूममध्ये आणला नाण्यांनी भरलेला ड्रम
चार वर्षांच्या प्रयत्नांचे फळ मिळालं. शनिवारी बच्चू चौधरी चंद्रकोणा टाउनमधील गोसाई बाजार येथील शोरूममध्ये पोहोचले. त्यांनी कर्मचाऱ्यांना सांगितलं की, त्याला स्कूटी खरेदी करायची आहे. शोरूमचे कर्मचारी अरिंदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, "जेव्हा बच्चू यांनी ड्रम आणला तेव्हा आम्ही सर्वजण आश्चर्यचकित झालो. ड्रम इतका जड होता की तो उघडण्यासाठी आणि जमिनीवर पसरलेली नाणी मोजण्यासाठी आठ लोक कामाला लागले."
पैसे मोजायला लागले २ तास २५ मिनिटं
"मोजणीत असं समोर आलं की ड्रममध्ये अंदाजे ६९,००० रुपयांची नाणी होती आणि उर्वरित नोटा होता. एकूण ११०,००० रुपये होते." दोन तास आणि २५ मिनिटं पैशांची मोजणी केल्यानंतर, बच्चू चौधरी यांनी अखेर त्यांच्या मुलीचं स्वप्न पूर्ण केलं आणि स्कूटी खरेदी केली. "मी श्रीमंत नाही, पण मला माझ्या मुलीचं स्वप्न अपूर्ण राहू द्यायचं नव्हतं. चार वर्षांच्या कष्टाचं फळ मिळालं" असं बच्चू चौधरी यांनी म्हटलं आहे.