CoronaVirus: समुद्रात अडकलेल्या नाविकांना दिलासा; घरी परतणं शक्य होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 07:12 AM2020-04-22T07:12:06+5:302020-04-22T07:13:12+5:30

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या नवीन निर्देशाचा लाभ होणार 

MHA guidelines out sailors stranded on ports at sea can return home | CoronaVirus: समुद्रात अडकलेल्या नाविकांना दिलासा; घरी परतणं शक्य होणार

CoronaVirus: समुद्रात अडकलेल्या नाविकांना दिलासा; घरी परतणं शक्य होणार

Next

- खलील गिरकर

मुंबई: केंद्रीय गृहमंत्रालयाने मंगळवारी रात्री उशिरा  स्टॅंटर्ड ऑपरेशन प्रोसिजर (एसओपी) मध्ये केलेल्या बदलांचा थेट लाभ विविध जहाजांवर भर समुद्रात, बंदराजवळ अडकलेल्या मात्र बंदरावर उतरण्यास प्रतिबंध असलेल्या नाविकांना होणार आहे. मुंबई जवळील समुद्रात असलेल्या मॅरेला डिस्कव्हरी या जहाजावरील नाविकांना व इतर जहाजांवरील नाविकांना कामावरुन घरी परतणे या निर्णयामुळे शक्य होणार आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे. बुधवारी हे जहाज युरोपला रवाना होणार होते. त्यापूर्वी या नियमाची अंमलबजावणी झाल्यास या नाविकांना घरी परतणे शक्य होईल.

प्रवासी जहाजे व व्यापारी जहाजांवर कार्यरत असलेल्या नाविकांना देशातील बंदरातून कामावर जाणे व भारतीय बंदरात उतरुन साईन ऑफ होणे यामुळे शक्य होणार आहे. त्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने काही नियमांचे पालन करण्याची अट ठेवली आहे. नाविकांना त्याच्या गेल्या २८ दिवसांतील प्रवासाची माहिती कंपनीला  द्यावी लागेल. डीजी शिपिंगने प्राधिकृत केलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याद्वारे संबंधित नाविकाची वैद्यकीय तपासणी केली जाईल. त्याच्यामध्ये कोविड १९ ची कोणतीही लक्षणे दिसून आली नाही, तर त्याला कामावर ठेवले जाईल. नाविकाचे निवासस्थान असलेल्या ठिकाणच्या स्थानिक प्रशासनाला याबाबत माहिती देण्यात येईल व त्यांना स्थानिक प्रवासासाठी पास उपलब्ध करुन देण्यास सांगण्यात येईल. ज्या बंदरात जहाजामध्ये प्रवास सुरु करायचा असेल त्या ठिकाणी नाविकाची कोविड १९ ची तपासणी केली जाईल व त्याचा अहवाल निगेटिव्ह आला तरच त्याला प्रवासाला परवानगी देण्यात येईल.
 
विदेशी बंदरातून भारतीय बंदराजवळ, समुद्रात असलेल्या जहाजांमधील नाविकांना कामावरुन घरी परतण्यासाठी (सी ऑफ) करण्यासाठी देखील निर्देश देण्यात आले आहेत. भारतीय हद्दीत, बंदरात जहाजाला थांबा देण्यापूर्वी जहाजाच्या कप्तानाला जहाजातील सर्व नाविकांच्या वैद्यकीय अहवालाची माहिती द्यावी लागेल. स्थानिक बंदर प्रशासनाला कप्तानाने त्याच्या जहाजातील सर्वांच्या गेल्या २८ दिवसांतील प्रवासाची माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे. जहाजाला बंदरात बर्थिंग देण्यापूर्वी स्थानिक बंदर प्रशासन त्यातील नाविकांबाबत वैद्यकीय माहिती घेतील. जहाजातील नाविकांची बंदर प्रशासनाच्या अखत्यारीत कोविड १९ ची तपासणी केली जाईल व ती टेस्ट निगेटिव्ह आल्यास त्यांना घरी जाण्याची परवानगी देण्यात येईल. जर तपासणी पॉझिटिव्ह आली तर त्यांच्यावर वैद्यकीय उपचार केले जातील. तपासणीचा अहवाल येईपर्यंत नाविकांना स्थानिक प्रशासनाने नेमून दिलेल्या ठिकाणी कॉरन्टाईन व्हावे लागेल. अहवाल निगेटिव्ह आल्यावर त्यांना घरी जाण्यासाठी पास उपलब्ध करुन देण्यात येईल व नेमून दिलेल्या मार्गाने त्यांना घरी परतता येईल. घरी जाताना देखील त्यांना सोशल डिस्टन्सिंगचे कठोरपणे पालन करावे लागेल. डीजी शिपिंग याबाबत अधिक सखोलपणे निर्देश देतील व त्याप्रमाणे कार्यवाही करणे अपेक्षित आहे, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

केंद्रीय नौकावहन मंत्री मनसुख मांडवीय यांनी याबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांचे आभार व्यक्त केले असून नाविकांना कामावरुन घरी परतणे आता शक्य होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. बंदरांमध्ये जहाजांमधील क्रू बदल करण्यामधील अडचणी दूर होतील व या एसओपी च्या माध्यमातून हे काम सुलभरित्या होईल, असे ते म्हणाले. सध्या नाविकांना भेडसावणाऱ्या समस्या याद्वारे मार्गी लागतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Web Title: MHA guidelines out sailors stranded on ports at sea can return home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.