"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 19:42 IST2025-12-13T19:40:43+5:302025-12-13T19:42:06+5:30
लिओनेल मेस्सीच्या कोलकाता दौऱ्यादरम्यान झालेल्या गोंधळावरून पश्चिम बंगालमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

फोटो - आजतक
लिओनेल मेस्सीच्या कोलकाता दौऱ्यादरम्यान झालेल्या गोंधळावरून पश्चिम बंगालमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. सॉल्ट लेक येथील स्टेडियममध्ये झालेल्या गोंधळानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी माफी मागितली. दुसरीकडे भाजपाने या घटनेमुळे 'बंगाल आणि फुटबॉल' या दोघांचाही अपमान झाल्याचं म्हणत तृणमूल काँग्रेस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
मेस्सी १० मिनिटांतच गेल्याने महागडी तिकिटं विकत घेऊन स्टेडियममध्ये आलेल्या हजारो फुटबॉलप्रेमींना यामुळे मोठा धक्का बसला. संतप्त फॅन्सनी गोंधळ घातला. त्यानंतर बाटल्या फेकल्या, होर्डिंग्स फाडले, खुर्च्या तोडल्या. यावर भाजपा आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधत त्या 'मगरीचे अश्रू' ढाळत आहेत, असं म्हटलं.
Stop shedding crocodile tears. This mismanagement and corruption are endemic to everything your government does. The TMC has launched a frontal attack on the emotions of the people of West Bengal and insulted every football lover.
— Amit Malviya (@amitmalviya) December 13, 2025
You must immediately ensure accountability and… https://t.co/JS6OeWfdG6
मालवीय यांनी आरोप केला की, 'ही मिसमॅनेजमेंट आणि भ्रष्टाचार तृणमूल सरकारच्या कार्यशैलीचा भाग बनला आहे.' मालवीय म्हणाले की, 'या घटनेने बंगालच्या लोकांच्या भावनांचा आणि फुटबॉलप्रेमींचा अपमान केला आहे.' त्यांनी राज्याचे क्रीडामंत्री अरूप बिस्वास आणि मंत्री सुजित बोस यांच्यावर एफआयआर दाखल करण्याची, त्यांना त्यांच्या पदावरून हटवण्याची आणि प्रेक्षकांना तिकिटाचे पूर्ण पैसे परत करण्याची मागणी केली.
Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
"मी माफी मागते"; मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शुभंकर सरकार यांनीही सरकारला धारेवर धरत प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरली असून या अव्यवस्थेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर बंगालची प्रतिमा मलीन झाली आहे, असं म्हटलं. तृणमूल काँग्रेसने मात्र या आयोजनापासून स्वतःला वेगळं ठेवत हा कार्यक्रम एका खासगी एजन्सीने आयोजित केला होता, असं सांगितलं.
Video - मेस्सी आला, ५ मिनिटांत गेला, फॅन्सचा पारा चढला; खुर्च्या फेकल्या, स्टेडियममध्ये तोडफोड
टीएमसीचे प्रवक्ते तौसीफ रहमान यांनी या कार्यक्रमात पक्षाची कोणतीही भूमिका नसल्याचा दावा केला. पक्षाचे नेते कुणाल घोष यांनी ही घटना दुर्दैवी असल्याचं सांगितलं आणि राज्य सरकारने मेस्सीची माफी मागितली असून चौकशी समिती नेमली आहे, असं म्हटलं. त्याचबरोबर त्यांनी घोषणाबाजी, तोडफोड आणि झेंड्यांबद्दल प्रश्न उपस्थित करत कटाची शक्यताही व्यक्त केली.