Meghalaya Election 2023: 'विरोधक माझ्या मरणाची वाट पाहत आहेत; पण...' PM मोदींचे विरोधकांवर टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2023 18:20 IST2023-02-24T18:19:59+5:302023-02-24T18:20:07+5:30
PM Modi Meghalaya Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मेघालयात बोलाना काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.

Meghalaya Election 2023: 'विरोधक माझ्या मरणाची वाट पाहत आहेत; पण...' PM मोदींचे विरोधकांवर टीकास्त्र
Meghalaya Assembly Election: आगामी मेघालय विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (24 फेब्रुवारी) राज्यातील तुरा येथे सभा घेतली. यावेळी मोदींनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, काँग्रेसला निवडणुकीच्या वेळीच मेघालयाची आठवण यायची. ते तुमच्या हक्काचे पैसे लुटायचे, मेघालय हे काँग्रेससाठी एटीएम आहे.
मोदी पुढे म्हणतात की, 'भाजप जात आणि धर्माच्या आधारावर भेदभाव करत नाही. आमच्या सरकारने केरळमधून एका ख्रिश्चन नर्सला इराकमधील दहशतवाद्यांच्या हातातून सोडवून आणले. आम्ही ख्रिश्चन धर्मासह सर्वांसाठी काम केले आहे. आम्ही मेघालयसह संपूर्ण ईशान्येच्या विकासासाठी जुनी विचारसरणी आणि दृष्टीकोन बदलला आहे. काँग्रेस सरकारने हा भाग देशाचा शेवटचा भाग मानला होता तर भाजप ईशान्येला देशाच्या विकासाचे इंजिन मानते.'
मोदी जिवंत असेपर्यंत आपले काहीही होणार नाही, असे काही राजकीय पक्षांना वाटत असल्याचा दावा मोदींनी केला. यामुळे विरोधक निराश झाले आहेत. काही पक्ष मोदी मरण्याची वाट पाहत आहेत, तर काही पक्ष मोदींची कबर खोदण्याचा विचार करत आहेत. मेघालयमधील भाजप सरकार म्हणजे घोटाळे आणि भ्रष्टाचारापासून मुक्तता. राज्यातील भाजप सरकार म्हणजे गरिबांना पक्की घरे, वीज आणि पाणी देणारे सरकार. इथल्या महिला, बहिणी आणि मुलींच्या समस्या कमी करणारे सरकार. हे सगळं पाहून इथल्या लोकांनी ठरवलं की दिल्ली आणि शिलाँग या दोन्ही ठिकाणी भाजपचं सरकार असायला हवं, असंही मोदी म्हणाले.