पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 18:49 IST2025-12-26T18:49:33+5:302025-12-26T18:49:54+5:30
Madhya Pradesh News: मध्य प्रदेशमधील खरगौन येथे आयोजित करण्यात आलेल्या खासदार क्रीडा महोत्सवामध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंनी महोत्वाच्या समारोप सोहळ्यामध्ये संतप्त होत गोंधळ घातला.

पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
मध्य प्रदेशमधील खरगौन येथे आयोजित करण्यात आलेल्या खासदार क्रीडा महोत्सवामध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंनी महोत्वाच्या समारोप सोहळ्यामध्ये संतप्त होत गोंधळ घातला. संतप्त खेळाडूंना भाजपाचे राज्यसभा खासदार सुमेर सिंह सोलंकी यांना घेराव घातला. तसेच स्पर्धेवेळी खेळाडूंना उपाशीतापाशी ठेवल्याचा आरोप केला. तसेच संतापलेल्या खेळाडूंनी या स्पर्धेत मिळवलेली पदके फेकून दिली, तर प्रमाणपत्रे फाडून टाकली. खासदारांकडे बक्षीस देण्यासाठी पैसे नव्हते तर स्पर्धा आयोजित केली कशाला? असा सवाल संतप्त खेळाडूंनी विचारला.
मध्य प्रदेशमधील खरगोन शहरातील बिस्टान रोड येथील स्टेडियममध्ये आयोजित क्रीडा महोत्सवाच्या समारोपावेळी शालेय खेळाडूंनी आपापली प्रमाणपत्रे फाडून फेकून दिली. तसेच स्पर्धेत मिळवलेली पदकेही मैदानात फेकली. खासदार सुमेरसिंह सोलंकी यांना घेराव घालून बक्षीसाची रक्कम देण्याची मागणी केली.
मात्र खेळाडूंचा वाढता विरोध पाहून खासदार सोलंकी खेळाडूंशी काहीही न बोलता कारमध्ये बसून निघून गेले. त्यामुळे खेळाडू अधिकच संतप्त झाले. त्यांनी मैदाना गोंधळ घातला. तसेच जिंकलेली पदके मैदानात फेकून रोष व्यक्त केला. खासदार सुमेरसिंह सोलंकी यांनी बडवानी जिल्ह्यामध्ये पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाने जिंकलेल्या खेळाडूंना रोख रक्कम बक्षीस म्हणून दिली होती. मात्र येथे कुठलीही रक्कम बक्षीस म्हणून दिली गेली नाही. एवढंच नाही तर स्पर्धेवेळी खाण्यापिण्याचीही कुठलीही व्यवस्था नव्हती, असा आरोप खेळाडूंनी केला.
दरम्यान, या संपूर्ण घटनेवर स्पष्टीकरण देताना खासदार सुमेरसिंह सोलंकी यांनी सांगितले की, माझ्याकडे निधीची व्यवस्था नाही आहे. जिथे बक्षिसे दिली गेली, तिथे आपापल्या पातळीवर व्यवस्था करण्यात आली होती. खरगौन जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनाचं निमित्त साधून खासदार क्रीडा महोत्सवाची सुरुवात करण्यात आली होती. गुरुवारी अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनी या महोत्सवाचा समारोप झाला.