बॉयफ्रेंडसोबत व्हिडीओ कॉलदरम्यानच 'ति'ने स्वतःला संपवलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2018 16:20 IST2018-02-19T16:17:05+5:302018-02-19T16:20:28+5:30
पोलिसांनी हनिशा चौधरीचा मोबाईल जप्त केला आहे. आता मोबाईल आणि इतर गोष्टींच्या माध्यमातून आत्महत्येचं नेमकं कारण काय, याचा तपास पोलिस करत आहेत.

बॉयफ्रेंडसोबत व्हिडीओ कॉलदरम्यानच 'ति'ने स्वतःला संपवलं
हैदराबाद : हैदराबादमध्ये एका तरूणीने बॉयफ्रेंडसोबत व्हिडीओ कॉल सुरू असतानाच आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या तरूण विद्यार्थिनीने आपल्या हॉस्टेलच्या रूममध्येच फाशी घेवून स्वतःचं जीवन संपवलं. कोम्पली क्षेत्रातील एका खासगी हॉस्टेलमध्ये शनिवारी रात्री ही घटना घडली.
हनिशा चौधरी ही तरूणी दक्षित पटेल नावाच्या तिच्या बॉयफ्रेंडसोबत व्हिडीओ कॉलिंगद्वारे बोलत होती. दरम्यान, दोघांचं किरकोळ भांडण झालं होतं, त्यावरुन तिने स्वत:ला संपवण्याची धमकी दिली अशी खात्रीलायक माहिती आहे. त्यानंतर व्हिडीओ कॉलदरम्यानच तिने स्वतःला फासावर लटकवलं आणि आपलं जीवन संपवलं. हा प्रकार सुरू असताना बॉयफ्रेंडनेही हॉस्टेलमध्ये धाव घेतली होती, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. त्याने हनिशाला तातडीने डॉक्टरकडे नेले. मात्र हॉस्पिटलमध्ये नेताच डॉक्टरांनी हनिशाला मृत घोषित केले. हनिशा आंध्र प्रदेशच्या अनंतपूर जिल्ह्यातील रहिवासी होती.
हनिशाच्या नातेवाईकांनी यासंदर्भात पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी हनिशाचा मोबाइल ताब्यात घेतला आहे. आत्महत्येच्या मागचं नेमकं कारण काय, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.