Ajmer Hotel Fire: पश्चिम बंगालनंतर राजस्थानमधील अजमेरमध्ये एक वेदनादायक घटना समोर आली आहे. बंगालनंतर अजमेर येथे एका हॉटेलला लागलेल्या आगीत चार जण जिवंत होरपळले. या घटनेत अनेक लोक भाजले गेल्याचीही माहिती समोर आली आहे. आग लागल्यानंतर लोकांनी हॉटेलच्या खिडक्यांमधून उड्या मारून आपले प्राण वाचवल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. हॉटेलमध्ये आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे बोलले जात आहे. मात्र आग लागण्याचे प्रमुख कारण तपासानंतर समोर येणार आहे.
अजमेर येथील दिग्गी बाजार परिसरातील हॉटेल नाझमध्ये ही आग लागली होती. हॉटेलमध्ये आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे सांगितले जात आहे. ५ मजली हॉटेलमध्ये आग लागल्याने घबराट निर्माण झाली होती. हॉटेल अरुंद गल्लीत असल्याने बचाव कार्यात बऱ्याच अडचणी येत होत्या. या आगीत चार जणांचा मृत्यू झाला असून जखमींना जेएलएन रुग्णालयात नेण्यात आले आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नाज हॉटेलला लागलेल्या आगीत चार वर्षांच्या मुलासह चार जण जिवंत जाळून ठार झाले. यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे. गुरुवारी पहाटेच्या सुमारास नाझ हॉटेलमध्ये भीषण आग लागली. आगीमुळे हॉटेलच्या खोल्यांमध्ये धूर वेगाने भरू लागला. लोक जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे धावू लागले. त्यावेळी जे बाहेर पडू शकले नाहीत, ते हॉटेलच्या आगीत होरपळले गेले. अपघाताच्या वेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी सांगितले की, लोकांनी जीव वाचवण्यासाठी खिडकीतून उड्या मारल्या. यादरम्यान, एका महिलेने तिच्या मुलाला वाचवण्यासाठी खिडकीतून बाहेर फेकले.
दिग्गी बाजार येथील हॉटेलमध्ये राहण्यासाठी अनेक पर्यटक आले होते. यावेळी, सर्वजण हॉटेलची खोली भाड्याने घेऊन विश्रांती करत होते. अचानक आग लागल्याची बातमी मिळताच सर्वजण बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागले. त्यातील बहुतेक लोकांचे प्राण वाचले, पण आगीत चार जणांचा होरपळून मृत्यू झाला. हॉटेलमध्ये लागलेल्या आगीमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. हॉटेलकडे अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र होते का? हॉटेल कायदेशीररित्या चालवले जात होते का? हॉटेलमध्ये आग आटोक्यात आणण्यासाठी काही साधने होती का? हॉटेल इतक्या अरुंद रस्त्यावर असल्याने हॉटेल व्यवस्थापकांनी कोणती तयारी केली होती? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.