मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 11:03 IST2025-11-10T11:02:01+5:302025-11-10T11:03:49+5:30
आदिल अहमदच्या चौकशीतून समोर आलेल्या ठिकाणांवर पोलिसांच्या टीमने धाड टाकली. त्याठिकाणी जवळपास ३०० किलो आरडीएक्स,एक एके ४७ आणि अनेक जिवंत काडतुसे जप्त केली.

मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
फरीदाबाद - जम्मू काश्मीर पोलिसांनी एक खतरनाक दहशतवादी षडयंत्राचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी २ दिवसांपूर्वी अटक केलेल्या डॉक्टर आदिल अहमदनं सांगितलेल्या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. हरियाणाच्या फरिदाबाद येथे ३०० किलो आरडीएक्स, एके ४७ आणि दारूगोळा पकडला आहे.
८ नोव्हेंबरला श्रीनगर पोलिसांनी मोठी कारवाई करत अनंतनाग येथील सरकारी मेडिकल कॉलेजचे माजी डॉक्टर आदिल अहमद यांच्या लॉकरमधून एके ४७ रायफल जप्त केली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात सखोल चौकशी सुरू केली. माहितीनुसार, आदिल अहमद अनंतनागमध्ये सीनियर रेजिडेंट डॉक्टर पदावर कार्यरत होता परंतु त्याच्या लॉकरमधून एके ४७ बंदूक सापडल्यानंतर सुरक्षा यंत्रणांना त्याचे दहशतवादी संघटना जैशसोबत संबंध असल्याचा संशय आणखी बळावला. पोलिसांनी जेव्हा तपास सुरू केला, तेव्हा डॉक्टरने सांगितलेल्या फरिदाबाद या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आरडीएक्स पकडले. डॉक्टर आदिल अहमदच्या चौकशीत अनेक खुलासे समोर आले आहेत.
आदिल अहमदच्या चौकशीतून समोर आलेल्या ठिकाणांवर पोलिसांच्या टीमने धाड टाकली. त्याठिकाणी जवळपास ३०० किलो आरडीएक्स,एक एके ४७ आणि अनेक जिवंत काडतुसे जप्त केली. हे स्फोटक साहित्य एखाद्या मोठ्या दहशतवादी हल्ल्यात वापरले जाणार होते असं पोलिसांनी म्हटलं. आरोपी डॉक्टरचे संबंध पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांशी होते. तो दीर्घ काळापासून दहशतवाद्यांना मदत करायचा. या संपूर्ण नेटवर्कमध्ये अनेक राज्याचे लोक सहभागी आहेत. येणाऱ्या काळात या प्रकरणात आणखी काही अटक होण्याची शक्यता आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात आरडीएक्स हरियाणापर्यंत कसे पोहचले आणि त्यांचे टार्गेट काय याचाही तपास केला जात आहे.
गुजरातमधून तीन दहशतवादी अटकेत
दरम्यान, गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) देशात एरंडीच्या बियांपासून तयार केल्या जाणाऱ्या 'रिसिन' नामक विषाच्या माध्यमातून भयंकर हल्ला करण्याचा एक कट उधळून लावला. या कारवाईत चीनमध्ये एमबीबीएस केलेल्या एका डॉक्टरसह तिघांना अटक करण्यात आली आहे. या माध्यमातून एका संशयित दहशतवादी सिंडिकेटचा पर्दाफाश झाला आहे. या तिघांकडून तीन पिस्तूल, ३० काडतुसे आणि एरंडीचे चार लिटर तेल, तीन मोबाइल आणि दोन लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत. अटक करण्यात आलेल्यांत डॉ. अहमद मोहियुद्दीन सय्यद, आझाद सुलेमान शेख व सुहेल मोहम्मद सलिम यांचा समावेश आहे. या तिघांनी लखनौ, दिल्ली व अहमदाबादमध्ये अनेक संवेदनशील ठिकाणांची रेकी केली होती. या कटातील म्होरक्या मध्य आशियातील खुरासान येथील 'इस्लामिक स्टेट' शी संबंधित आहे, अशी माहिती गुजरात एटीएसचे उपमहासंचालक सुनील जोशी यांनी दिली.