प्रियकरासाठी विवाहित महिलेने आपल्याच घरावर घातला दरोडा, दागिने-रोकड लांबवली, त्यानंतर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 16:16 IST2025-09-10T16:15:50+5:302025-09-10T16:16:05+5:30
Uttar Pradesh Crime News: गेल्या काही काळात सातत्याने वाढत असलेल्या विवाहबाह्य संबंधांमधून मोठ्या प्रमाणात गंभीर गुन्हे घडत आहेत. अशाच प्रेमात आंधळ्या झालेल्या एका विवाहित महिलेने प्रियकरासाठी स्वत:च्याच घरात दरोडा घातल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

प्रियकरासाठी विवाहित महिलेने आपल्याच घरावर घातला दरोडा, दागिने-रोकड लांबवली, त्यानंतर...
गेल्या काही काळात सातत्याने वाढत असलेल्या विवाहबाह्य संबंधांमधून मोठ्या प्रमाणात गंभीर गुन्हे घडत आहेत. अशाच प्रेमात आंधळ्या झालेल्या एका विवाहित महिलेने प्रियकरासाठी स्वत:च्याच घरात दरोडा घातल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. उत्तर प्रदेशमधील हापूडमध्ये ही घटना घडली आहे. येथील रहिवासी असलेल्या एका विवाहित महिलेने पतीची फसवणूक करून एका प्रियकरासोबत प्रेमसंबंध प्रस्थापित केले. एवढंच नाही तर तिने प्रियकराची आर्थिक गरज भागवण्यासाठी स्वत:च्यात घरातील रोख रक्कम आणि दागिन्यांवर डल्ला मारला.
या महिलेने प्रियकरासाठी आपल्या घरातील सहा लाख रुपयांचे दागिने आणि दोन लाख रुपयांची रोख रक्कम लांबवली. दरम्यान, पोलीस तपासामध्ये या महिलेचं पितळ उघडं पडलं. त्यानंतर पोलिसांनी आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेत अटक केली. तसेच त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमालही जप्त करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार हापुडमधील धौलाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिपलेंडा गावात राहणाऱ्या इस्राइलच्या घरी १९ ऑगस्ट रोजी रात्री चोरी झाली होती. चोरीमध्ये इस्राइलच्या कुटुंबातून सहा लाख रुपयांचे दागदागिने आणि दोन लाख रुपये लंपास करण्यात आले होते. या चोरीच्या घटनेची माहिती इसराइलने धौलाना पोलिसांना दिली. त्यानंतर पोरिसांनी चोरट्यांचा शोध घेण्यासाठी तपासाला सुरुवात केली. शोध सुरू असतानाचा इस्राइलची पत्नी फरहीन आमि तिचा प्रियकर वाहिद पोलिसांच्या हाती लागले. या दोघांकडूनही सहा लाख रुपयांचे दागिने आणि १ लाख ९७ हजार ५०० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.