कैद्याकडून राष्ट्रपती भवनचा नकाशा जप्त

By Admin | Updated: June 10, 2015 00:01 IST2015-06-10T00:01:53+5:302015-06-10T00:01:53+5:30

उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद तुरुंगात काही दिवसांपूर्वी मारण्यात आलेल्या छाप्यादरम्यान एका विचाराधीन कैद्याकडे राष्ट्रपती भवनाचा नकाशा आढळला आहे.

The map of the president's house was seized from the prisoner | कैद्याकडून राष्ट्रपती भवनचा नकाशा जप्त

कैद्याकडून राष्ट्रपती भवनचा नकाशा जप्त

लखनौ : उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद तुरुंगात काही दिवसांपूर्वी मारण्यात आलेल्या छाप्यादरम्यान एका विचाराधीन कैद्याकडे राष्ट्रपती भवन आणि राजपथावरील अनेक महत्त्वपूर्ण ठिकाणांचे नकाशे तसेच भारत-बांगलादेश सीमेवरील भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) चौक्यांची रेखाटने सापडल्याने खळबळ उडाली आहे. यानंतर राज्य पोलिसांचे एक पथक तपासासाठी पश्चिम बंगालमध्ये दाखल झाले आहे.
गत ७ जूनला राज्यभरातील तुरुंगांची झडती घेण्यात आली. या दरम्यान मुरादाबाद तुरुंगात सद्दीक अली नामक एका विचाराधीन कैद्याकडून राष्ट्रपती भवन, राजपथासारख्या अनेक संवेदनशील आणि महत्त्वपूर्ण ठिकाणांचे नकाशे जप्त करण्यात आले. भारत-बांगलादेश सीमेवर बनलेल्या बीएसएफच्या चौक्यांची रेखाटनेही त्याच्याकडे सापडली.
एका हत्येच्या प्रकरणात सद्दीक अलीला अटक झाली होती. गत चार वर्षांपासून तो मुरादाबादच्या तुरुंगात बंद असून तो मूळचा पश्चिम बंगालचा आहे. २०११ मध्ये संभल जिल्ह्यात किरकोळ वादातून आपल्या एका सहकाऱ्याच्या कथित हत्येप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. अलीच्या पिशवीतून हिंदी, मंदारिन आणि बंगाली भाषेतील काही कागदपत्रे, दोन मेमरी कार्डही जप्त करण्यात आले.
मुरादाबादचे पोलीस महानिरीक्षक ओंकार सिंह यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे. आम्ही सद्दीक अलीची पार्श्वभूमी तपासण्यासाठी एक पोलीस पथक प. बंगालला पाठवले आहे. याशिवाय दहशतवादविरोधी दलासही सतर्क केले आहे. अलीकडे आढळलेल्या नकाशात नवी दिल्लीच्या मार्गांचे नकाशे आहेत, असे त्यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)

पोलीस म्हणतात, गुगलवरून डाऊनलोड केले नकाशे
> अली एका चिनी नागरिकास ओळखतो. त्याच्याकडून त्याने मंदारिन भाषा शिकली. अलीकडे सापडलेले अनेक नकाशे त्याने गुगलवरून डाऊनलोड केलेले आहेत, असे पोलीस महानिरीक्षक ओंकार सिंह यांनी सांगितले.
> काही वर्षांपूर्वी तो आणि त्याचे वडील उत्तर प्रदेशच्या संभल जिल्ह्यात आले होते आणि एका मांस निर्यात कंपनीत मजुरी करायचे, अशी माहिती खुद्द अलीनेच चौकशीदरम्यान पोलिसांना दिली होती.

Web Title: The map of the president's house was seized from the prisoner