Congress Meeting : अहमदाबादमध्ये सुरू असलेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात राहुल गांधींनी वक्फ दुरुस्ती कायदा, ओबीसी आरक्षण आणि सरदार वल्लभभाई पटेल यांचा आपला भाषणात उल्लेख केला. आता या भाषणावरुन भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार रविशंकर प्रसाद यांनी जोरदार हल्लाबोल केला. आज पटेलांवर प्रेम दाखवणाऱ्या काँग्रेसने 41 वर्षे त्यांना भारतरत्न का दिले नाही, हे स्पष्ट करावे? असा सवाल त्यांनी केला.
संसदेत का बोलला नाही?वक्फ दुरुस्ती कायद्याला असंवैधानिक म्हणणाऱ्या राहुल गांधींवर टीका करताना रविशंकर प्रसाद म्हणतात, जेव्हा संसदेत चर्चा झाली, तेव्हा राहुल गांधी वक्फवर का बोलले नाहीत? कोणत्या मुद्द्यावर काय बोलावे, हे त्यांना कळत नाही. वक्फवर बोलण्यासाठी राहुल गांधींना अहमदाबादची वाट पहावी लागली. सभागृहात 12-13 तास चर्चा झाली, तेव्हा बोलायला हवे होते, आता काँग्रेसच्या अधिवेशनात बोलून काय फायदा? अशी टीका त्यांनी केली.
काँग्रेसला लाज वाटली पाहिजे...ते पुढे म्हणतात, काँग्रेसच्या अधिवेशनात "सोनिया गांधी हिंदुस्तान, राहुल गांधी हिंदुस्तान" अशी घोषणा दिली जात होती, तेव्हा त्या घोषणा का थांबवल्या नाही? जेपी चळवळीदरम्यान इंदिरा इंज इंडिया, इंडिया इज इंदिरा अशा घोषणा देण्यात आल्या होत्या. आणीबाणीनंतर इंदिरा गांधींचे काय झाले, ते तुम्हाला आठवत नाही का? आता तुम्हीही तोच नारा देत आहात? काँग्रेसच्या लोकांना थोडी लाज वाटली पाहिजे. भारत खूप मोठा आहे. भारताची प्रतिष्ठा आणि वारसा आपल्या सर्वांपेक्षा, सर्व पक्षांपेक्षा मोठा आहे.
काँग्रेस नेतृत्वाक किती ओबीसी?राहुल गांधींनी ओबीसींबद्दल चिंता व्यक्त केली. पण, काँग्रेसच्या सर्वोच्च नेतृत्वात किती ओबीसी आहेत, हे राहुल गांधींनी सांगावे. निर्णय घेण्याचे अधिकार तुमची आई सोनिया, बहीण प्रियांका आणि तुमच्याकडेच आहे. तुमच्या राज्यात कोणी ओबीसी मुख्यमंत्री आहे का? भाजप राज्यांमध्ये अनेक ओबीसी मुख्यमंत्री आहेत. केंद्रीय मंत्री ओबीसी आहेत. अनेक राज्यांचे अध्यक्ष आणि राष्ट्रीय संघटनेतही ओबीसी आहेत, असेही रविशंकर प्रसाद यांनी सांगितले.