मनोज तिवारी यांची दिल्ली भाजपाच्या अध्यक्षपदावरून उचलबांगडी, नव्या चेहऱ्याकडे सोपवली जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2020 17:08 IST2020-06-02T16:49:14+5:302020-06-02T17:08:06+5:30
भाजपाने दिल्लीसह छत्तीसगडमध्येही नेतृत्वबदल केला आहे. आता छत्तीसगड भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी विष्णुदेव साय यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर मणिपूरमध्ये एस. टिकेंद्र सिंह यांच्या खांद्यावर भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.

मनोज तिवारी यांची दिल्ली भाजपाच्या अध्यक्षपदावरून उचलबांगडी, नव्या चेहऱ्याकडे सोपवली जबाबदारी
नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर तीन महिन्यांनी भाजपाच्या राष्ट्रीय नेतृत्वाने दिल्लीतील पक्षाच्या नेतृत्वात मोठा फेरबदल केला आहे. दिल्लीचे भाजपा प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांची पदावरून उचलबांगडी करण्यात आली असून त्यांच्या जागी आदेश कुमार गुप्ता यांच्याकडे दिल्ली भाजपाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याबाबत भाजपाचे सरचिटणीस अरुण सिंह यांनी अधिकृत पत्र प्रसिद्ध केले आहे.
भाजपाने दिल्लीसह छत्तीसगडमध्येही नेतृत्वबदल केला आहे. आता छत्तीसगड भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी विष्णुदेव साय यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर मणिपूरमध्ये एस. टिकेंद्र सिंह यांच्या खांद्यावर भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.
गतवर्षी झालेल्या छत्तीसगड विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाला दारुण पराभव पत्करावा लागला होता. तर दिल्ली विधानसभा निवडणुकीतही भाजपाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता. तेव्हापासूनच दोन्ही राज्यांत नेतृत्वबदलाची चर्चा सुरू होती.
दरम्यान, दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार मनोज तिवारी यांनी राजीनामा देऊ केला होता. मात्र त्यांचा राजीनामा नामंजुर करण्यात आला होता. यादरम्यान, मनोज तिवार यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये ते लॉकडाऊनचे उल्लंघन करताना दिसले होते. त्यावरून त्यांच्यावर खूप टीकाही झाली होती. त्यानंतर काही दिवसांतच त्यांना पदावरून दूर करण्यात आले आहे.