Manipur Violence: मणिपूरमध्ये पुन्हा हिंसेचा भडका! आंदोलकांचा कार्यालयावर हल्ला, पोलीस अधीक्षक जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 22:59 IST2025-01-03T22:57:09+5:302025-01-03T22:59:55+5:30
कित्येक महिन्यांपासून हिंसाचाराच्या झळा बसत असलेल्या मणिपुरात शुक्रवारी पुन्हा एकदा हिंसक घटना घडली. निदर्शने करत असलेले आंदोलक अचानक हिंसक झाले आणि त्यांनी जिल्हा पोलीस मुख्यालयावर हल्ला केला.

Manipur Violence: मणिपूरमध्ये पुन्हा हिंसेचा भडका! आंदोलकांचा कार्यालयावर हल्ला, पोलीस अधीक्षक जखमी
Manipur Latest News: गेल्या काही दिवसांपासून शांत असलेल्या मणिपुरात पुन्हा एकदा हिंसेचा भडका उडाला. शुक्रवारी आंदोलकांच्या जमावाने मणिपुरातील कांगपोक्पी येथील पोलीस मुख्यालयालाच लक्ष्य केले. आंदोलकांनी केलेल्या हल्ल्यात पोलीस अधीक्षक जखमी झाले. शुक्रवारी (३ जानेवारी) सायंकाळी ही घटना घडली.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, कांगपोक्पी जिल्ह्यातील साईबोल गावात केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान तैनात करण्यात आलेले आहेत. इंफाळ पूर्व जिल्ह्याला लागून हे गाव असून, तेथून सुरक्षा दलाचे जवान काढून घेण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती. ती पूर्ण करण्यात अधिकारी अपयशी ठरल्याचा आरोप करत आंदोलकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढला होता.
पोलीस आणि आंदोलकांमध्ये हिंसक झडप
पोलीस आणि आंदोलकांमध्ये हिंसक झडप झाली. यात पोलीस अधीक्षक, पोलीस कर्मचारी आणि काही आंदोलक जखमी झाले.
सुरक्षा दलाचे जवान महिलांवर जबरदस्ती करत असल्याचा आरोप करत कुकी समुदायाच्या लोकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढला होता. आंदोलकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयावर दगडफेक केली. कार्यालयाच्या आवारात असलेली पोलिसांची काही वाहने जाळली.