मणिपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा पथकावर हल्ला, दोन दिवसांपूर्वी उसळला होता हिंसाचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2024 14:23 IST2024-06-10T14:21:36+5:302024-06-10T14:23:50+5:30
नुकत्याच झालेल्या या हिंसाचाराच्या घटनेमुळे जवळपास ७० घरे आणि काही सरकारी कार्यालये जाळण्यात आली होती.

मणिपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा पथकावर हल्ला, दोन दिवसांपूर्वी उसळला होता हिंसाचार
मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांच्या सुरक्षा पथकावर कुकी अतिरेक्यांनी हल्ला केला. जिरीबामला पाठवलेल्या या आगाऊ सुरक्षा पथकावर हल्ला करण्यात आला. मुख्यमंत्री एन बिरेन सिंह मंगळवारी जिरीबामला भेट देण्यासाठी जाणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी हे पथक जिरीबामला दाखल झाले होते.
अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआयडी राज्य पोलीस, सीआयएसएफ जवान आणि दोन सुरक्षा कर्मचारी जखमी झाले. एका जखमी जवानाला उपचारांसाठी इंफाळला पाठवण्यात आले आहे. दरम्यान, जिरीबाममध्ये गेल्या दोन दिवसांपासून हिंसाचाराचे वृत्त असून येथील परिस्थिती तणावपूर्ण आहे. या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांना मंगळवारी जिरीबामला भेट देणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, आगाऊ सुरक्षा दल इंफाळहून जिरीबाम जिल्ह्याच्या दिशेने जात होते. त्यानंतर सकाळी १०.३० च्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग-३७ वर (इंफाळ-सिलचर मार्गे जिरिबाम) कांगपोकपी जिल्ह्यातील कोटलाने जवळ टी लैजांग गावात हा हल्ला झाला. यादरम्यान दोन सुरक्षा कर्मचारी जखमी झाले. सध्या पोलीस कमांडो आणि आसाम रायफल्स (एआर) यांच्या संयुक्त पथकाकडून शोध मोहीम राबवली जात आहे.
जिरीबाम जिल्ह्यात उसळला होता हिंसाचार
६ जून रोजी अज्ञात हल्लेखोरांनी एका व्यक्तीची हत्या केली होती. यानंतर जिरीबाम जिल्ह्यात हिंसाचार उसळला होता. या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एन बिरेन सिंह मंगळवारी जिरीबाम जिल्ह्याला भेट देणार आहेत. दरम्यान, नुकत्याच झालेल्या या हिंसाचाराच्या घटनेमुळे जवळपास ७० घरे आणि काही सरकारी कार्यालये जाळण्यात आली होती. यामुळे शेकडो लोकांनी तेथून पलायन केले आहे.