उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये आयोजित करण्यात आलेल्या आंबा महोत्सवातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आंबा महोत्सव पाहण्यासाठी आलेले लोक तिथे प्रदर्शनात ठेवलेले आंबेच पळवून नेताना दिसत आहेत. लखनौमधील अवध शिल्पग्राम येथे हा आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. दरम्यान, आंबा महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली. तसेच या गर्दीमधील काही लोकांनी आंबा महोत्सवामध्ये केवळ प्रदर्शनासाठी ठेवलेले आंबे मिळेल त्यात भरून नेले.
अवध शिल्पग्राम येथे भरलेल्या या आंबा महोत्सवात देशातील विविध जातींचे आंबे प्रदर्शन आणि खरेदीसाठी ठेवण्यात आले होते. त्यात एकीकडे आंब्यांचं प्रदर्शन सुरू होतं. तर दुसरीकडे बाहेरील स्टॉलमध्ये त्यांची विक्री सुरू होती. मात्र प्रदर्शनाच्या अखेरच्या दिवशी लोकांनी प्रचंड गर्दी केली. तसेच प्रशासनाकडून गर्दीवर नियंत्रणाबाबत काहीसा ढिलाई बाळगली गेल्याने ही गर्दी बघता बघता नियंत्रणाबाहेर गेली. त्याच दरम्यान, प्रदर्शनामध्ये ठेवलेले आंबे काही लोकांनी उचलून नेण्यास सुरुवात केली. त्यांना पाहून इतर लोकांनीही मिळेल त्या वस्तूत आंबे घेऊन ते पळवण्यास सुरुवात केली.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार प्रदर्शनामध्ये जेव्हा लुटालूट सुरू झाली तेव्हा तिथे सुरक्षा रक्षक उपस्थित नव्हते. त्यामुळे लोक बिनधास्तपणे आंबे उचलून नेऊ लागले. या घटनेचे काही व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले. काही व्हिडीओ आणि फोटो सोशल माीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यात तिथे असलेले लोक बॅग आणि पिशव्यांमध्ये भरून आंबे नेताना दिसत आहेत.
३ जुलै ते ६ जुलै दरम्यान, लखनौमधील अवध शिल्पग्राम येथे चाललेल्या या आंबा महोत्सवात रटौल आंब्याने पहिला क्रमांक मिळवला.