हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2025 11:52 IST2025-08-24T11:51:53+5:302025-08-24T11:52:59+5:30
ढगफुटीनंतर अनेक ठिकाणी मोठं नुकसान झालं, ज्यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली.

हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
हिमाचल प्रदेशातील मंडीमध्ये पूर आणि पाऊस सतत कोसळत आहे. ढगफुटीनंतर अनेक ठिकाणी मोठं नुकसान झालं, ज्यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली. मंडीपासून ५० किमी अंतरावर असलेल्या चौहार खोऱ्यात रविवारी रात्री उशिरा ढगफुटीमुळे आरंग नाला अचानक पाण्याखाली गेला. त्यानंतर सानवड गावात बरंच नुकसान झालं.
रात्री ३ वाजता ढगफुटीची घटना घडली. प्रत्यक्षदर्शींच्या मते, अचानक मोठा स्फोट झाला, ज्याचा आवाज ऐकून लोक घाबरून पळून गेले. स्थानिक रहिवासी जितेंद्र कुमार ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, माझी चार दुकानं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. दुकानात सुमारे दोन ते अडीच लाखांचा माल होता. ४ तासांत सर्व काही उद्ध्वस्त झालं.
आरंग नाल्यात आलेल्या पुरात १० फूटब्रिज, तीन दुकानं, दोन घरं आणि दोन गोठे वाहून गेले. नाल्यात दोन कार आणि एक सायकल वाहून गेली. सरकारी शाळेत पाणी शिरले आणि तिची भिंत तुटली. ढगफुटीच्या घटनेला ५ दिवसांहून अधिक काळ लोटला आहे. पण परिस्थिती अजूनही सामान्य झालेली नाही. परिस्थिती अशी आहे की लोकांना अन्न आणि औषधंही मिळत नाहीत. गावात पोहोचण्याचा कोणताही मार्ग नाही आणि अनेक घरं अजूनही धोक्यात आहेत.
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
स्थानिक रहिवासी मणिराम म्हणतात, आता घर राहिलेलं नाही, तर आम्ही कुठे जाणार? अन्नाची व्यवस्था करावी लागेल. कोणतंही काम नाही. रेश्मी देवी म्हणतात, आम्हाला खूप भीती वाटते, पण आम्ही आता कुठे जाणार... आमच्याकडे घर नाही, पावसामुळे उत्पन्न नाही, सर्व काही वाहून गेले आहे, कसं कमवायचं. ७ लोकांचे कुटुंब, ४ मुलं आहेत. खूप नुकसान झालं आहे, लोक आजारी पडत आहेत आणि औषधंही मिळत नाहीत.
मंडीमध्ये परिस्थिती अजूनही फारशी चांगली नाही. गावकरी जीव मुठीत घेऊन जगत आहेत आणि आव्हानांना तोंड देत आहेत, परंतु त्यांना अजूनही आशा आहे की, परिस्थिती लवकरच सामान्य होईल जेणेकरून त्यांचं आयुष्य पुन्हा रुळावर येईल.