Sambhal Latest News: 24 नोव्हेंबर २०२४ रोजी संभलमध्ये हिंसाचाराची घटना घडली होती. हिंदुपूरखेडा परिसरात संभलचे पोलीस अधीक्षक के.के. विष्णोई यांच्यावरही गोळी झाडण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. आरोपीचे नाव तिल्लन असे असून, तो हिंसाचारानंतर पळून दिल्लीत लपला होता.
२४ नोव्हेंबर रोजी संभलमधील शाही जामा मशिदीत सर्वे सुरू झाल्यानंतर बाहेर गर्दी गोळा झाली होती. तर हिंदुपूरखेडा येथे हिंसक घटना घडली. हिंसाचार उफाळून आल्यानंतर पोलीस अधीक्षक के.के. बिष्णोई जेव्हा फौजफाट्यासह परिसरात पोहोचले. तेव्हा एका इमारतीच्या छतावरून एका तरुणाने त्यांच्यावर गोळीबार केला होता.
गोळीबार करून आरोपीने दिल्लीत घेतला आश्रय
यात पोलीस अधीक्षक के.के. बिष्णोई आणि त्यांचे जनसंपर्क अधिकारी जखमी झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी पथके स्थापन करून आरोपीचा शोध सुरू केला होता. पोलीस आरोपीचे ठिकाण शोधत होते.
आरोपी दिल्लीतील आधी जहांगीरपुरी आणि नंतर लक्ष्मी नगर या ठिकाणी असल्याचे कळल्यानंतर पोलिसांनी गुरुवारी त्याला बेड्या ठोकल्या. शाबेज उर्फ शहबाज उर्फ तिल्लन असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीकडून पिस्तूल आणि काडतुसे जप्त केली आहेत.