Court: भटक्या कुत्र्यांमुळे संसारात विघ्न; पत्नीच्या एका सवयीमुळे पतीचा घटस्फोटासाठी अर्ज, नेमकं प्रकरण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 13:07 IST2025-11-13T13:02:05+5:302025-11-13T13:07:32+5:30
Divorce Over Stray Dogs: भटक्या कुत्र्यांमुळे गुजरात येथील एका व्यक्तीचा संसार मोडण्याच्या उंबरठ्यावर आला आहे.

AI Image
भटक्या कुत्र्यांवर असलेल्या पत्नीच्या अति प्रेमामुळे एका ४१ वर्षीय पतीने गुजरात उच्च न्यायालयातघटस्फोटासाठी याचिका दाखल केली. पत्नीच्या क्रूर वागण्यामुळे आपल्याला केवळ मानसिक त्रास नव्हे, तर इरेक्टाइल डिसफंक्शनसारख्या शारीरिक समस्याही निर्माण झाल्याचा दावा त्याने आपल्या याचिकेत केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २००६ मध्ये या जोडप्याचे लग्न झाले. परंतु, लग्नानंतर लगेचच त्यांच्या संसारात कुत्र्यांमुळे अडचणी सुरू झाल्या. लग्नानंतर लगेचच पत्नीने सोसायटीत परवानगी नसतानाही एक भटका कुत्रा घरी आणला. हळूहळू तिने आणखी कुत्रे आणले आणि त्यांची काळजी घेणे, स्वयंपाक करणे व साफसफाईचे काम त्याला करायला लावले. एकदा एका कुत्र्याने त्याचा चावाही घेतला. कुत्र्यांमुळे सोसायटीतील लोक त्यांच्या विरोधात गेले आणि २००८ मध्ये हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. या प्रकरणानंतर पत्नी प्राणी हक्क गटात सामील झाली आणि तिने अनेकदा लोकांविरुद्ध तक्रारी दाखल केल्या.
पतीचे पत्नीवर आरोप
पतीचा आरोप आहे की, त्याची पत्नी त्याला वारंवार पोलीस ठाण्यात येण्यास सांगायची आणि त्याने नकार दिल्यास त्याचा अपमान करून शिवीगाळ करायची. या सततच्या तणावामुळे त्याची मानसिक स्थिती बिघडली आणि अखेरीस त्याला इरेक्टाइल डिसफंक्शनसारख्या शारीरिक समस्येने ग्रासले. पतीने एक गंभीर आरोप केला आहे की, १ एप्रिल २००७ रोजी पत्नीने एका रेडिओ जॉकीकडून विवाहबाह्य संबंधांचा बनावट प्रँक कॉल करून त्याची थट्टा केली. यामुळे त्याला कामाच्या ठिकाणी लज्जा वाटली. या अपमानानंतर तो बंगळूरला गेला, परंतु पत्नी त्याला कॉल आणि तक्रारी करून त्रास देत राहिली.
पतीची याचिका कोर्टाने फेटाळली
पतीने २०१७ मध्ये अहमदाबाद फॅमिली कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. मात्र, पत्नीने त्याला विरोध केला आणि तिने पतीचे कुत्र्यांना मिठी मारतानाचे व त्यांना जवळ घेतानाचे फोटो पुरावा म्हणून सादर केले. फेब्रुवारी २०२४ मध्ये, कौटुंबिक न्यायालयाने पतीची याचिका फेटाळून लावली. पत्नीने क्रूरता केली, हे पती सिद्ध करू शकला नाही. तसेच 'प्रँक कॉल घटस्फोटाचा आधार असू शकत नाही', असे न्यायालयाने स्पष्ट केले.
१ डिसेंबरला पुढील सुनावणी
या निकालानंतर पतीने आता उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्याने आपला संसार जवळपास मोडला असल्याचे म्हटले आहे. आणि पत्नीला १५ लाख रुपये पोटगी देण्याची तयारी दर्शवली. दुसरीकडे, पत्नीने २ कोटी रुपयांची नुकसानभरपाई मागितली आहे. गुजरात उच्च न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी १ डिसेंबर रोजी ठेवली आहे.