भांग पिऊन विमानात चढला अन्..., IndiGo फ्लाइटमध्ये प्रवाशाचा गोंधळ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2024 18:18 IST2024-05-26T18:17:21+5:302024-05-26T18:18:06+5:30
एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांनी तक्रार दाखल केल्यानंतर त्या प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. ही घटना २१ मे रोजी घडली होती. मात्र शुक्रवारी उघडकीस आली.

भांग पिऊन विमानात चढला अन्..., IndiGo फ्लाइटमध्ये प्रवाशाचा गोंधळ!
हैदराबाद : इंदूरहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगोच्या फ्लाइटमध्ये इमर्जन्सी गेट उघडण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ वर्षीय प्रवाशाने फ्लाइटमध्ये चढण्यापूर्वी 'भांग' पिली होती. तसेच, प्रवाशाने विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांशी वादही घातला होता. एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांनी तक्रार दाखल केल्यानंतर त्या प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. ही घटना २१ मे रोजी घडली होती. मात्र शुक्रवारी उघडकीस आली.
इंडिगो एअरलाइन्स कंपनीकडून याबाबतची अधिकृत माहिती देण्यात आली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, इंदूरहून हैदराबादमध्ये जात असलेल्या फ्लाइटमध्ये २१ मे रोजी एका प्रवाशाने इमर्जन्सी गेट उघडण्याचा प्रयत्न केला आहे. स्टँडर्ड ऑपरेटिंग सिस्टिमनुसार, प्रवाशाला गैरव्यवहार केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले. त्यानंतर विमानाने लँडिग करताच त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. प्रवाशांच्या सुरक्षेबाबत कोणताही हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही, असे म्हणत कंपनीने इतर प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, ज्यावेळी इंदूरहून हैदराबादला फ्लाइट झाली. त्यावेळी संबंधीत व्यक्ती सर्वांशी गैरव्यवहार करत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्या प्रवाशाला दुसऱ्या जागेवर बसवण्यात आले. मात्र, थोड्यावेळाने त्याने तीर्थयात्रेसाठी आलेल्या त्याच्या मित्रांजवळ बसण्याचा हट्ट सुरु केला. मात्र, इतरांनी समजूत काढल्यानंतर तो काही वेळ शांत बसला. मात्र, त्यानंतर पुन्हा त्याने फ्लाइटमध्ये गोंधळ घालण्यास सुरुवात केली.
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे इंस्पेक्टर बालाराजू यांच्या माहितीनुसार, विमानाने उड्डाण केले तेव्हा तो कारण नसताना संपूर्ण विमानात फिरत होता. जेव्हा वैमानिक फ्लाइट लँड करण्याच्या तयारीत होते, तेव्हा तो इमर्जन्सी गेट उघडण्याचा प्रयत्न करत होता. त्याचे कृत्य पाहून लोकांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. अनिल पाटील असे आरोपीचे नाव असून तो उज्जैन येथे महादेवाच्या दर्शनासाठी गेला होता.