महाराष्ट्राच्या तरुणाचा तमिळनाडूत दुर्दैवी अंत; सुपरस्टार विजयच्या सभेत हृदयविकाराचा तीव्र झटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 17:29 IST2026-02-13T16:42:30+5:302026-02-13T17:29:15+5:30
सुपरस्टार विजयच्या सभेमध्ये खाली कोसळल्यानंतर सूरजला रुग्णालयात नेण्यात आलं होतं.

महाराष्ट्राच्या तरुणाचा तमिळनाडूत दुर्दैवी अंत; सुपरस्टार विजयच्या सभेत हृदयविकाराचा तीव्र झटका
Tamil Nadu: दाक्षिणात्य सुपरस्टार विजय याच्या तमिळगा वेत्री कळघम या पक्षाच्या मेळाव्यात सहभागी झालेल्या एका ३७ वर्षीय महाराष्ट्रीयन तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. सूरज असे या दुर्दैवी तरुणाचे नाव असून, तो गेल्या २० वर्षांपासून तामिळनाडूतील सेलम येथे वास्तव्यास होता.
मिळालेल्या माहितीनुसार, सेलममधील सीलनायक्कनपट्टी येथे टीव्हीके पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आणि जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. पक्षाचे अध्यक्ष विजय हे स्वतः या सभेला संबोधित करणार होते. या सभेसाठी मोठी गर्दी झाली होती. सूरज हा प्रेक्षक म्हणून या मेळाव्याला हजर होता. सभा सुरू असतानाच तो अचानक जमिनीवर कोसळला आणि बेशुद्ध झाला.
रुग्णालयात नेण्यापूर्वीच प्राणज्योत मालवली
सूरज बेशुद्ध पडताच तिथे उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी आणि पोलिसांनी त्याला तात्काळ रुग्णवाहिकेतून जवळच्या खासगी रुग्णालयात हलवले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी त्याला तपासून ब्रॉट डेड घोषित केले. प्राथमिक अंदाजानुसार, मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगण्यात येत आहे.
#WATCH | Tamil Nadu: Body of 37-year-old man from Maharashtra, identified as Suraj, who died after reportedly suffering a heart attack during TVK's political meeting in Salem today, being taken from MH Hospital
— ANI (@ANI) February 13, 2026
Police say, "During the event, he suddenly collapsed. He was rushed… https://t.co/cdD2S06XTjpic.twitter.com/eTCxkaDEzl
कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
सूरज हा मूळचा महाराष्ट्राचा रहिवासी होता, मात्र मागील दोन दशकांपासून तो कुटुंबासह सेलममधील शिवशक्ती नगर भागात राहत होता. तो चांदीच्या अंगठ्या बनवण्याचे काम करायचा आणि कधीकधी बांधकाम मजूर म्हणूनही काम करायचा. त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. सूरजच्या अचानक जाण्याने या कष्टकरी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
पूर्वी झाली होती हार्ट सर्जरी
अण्णादानपट्टी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरज हा गेल्या एक वर्षापासून आजारी होता. काही काळापूर्वीच त्याच्यावर हृदयशस्त्रक्रिया करण्यात आली होती. प्रकृती पूर्णपणे ठीक नसतानाही तो सभेला उपस्थित राहिला होता. बराच वेळ तो मैदानावर बसून होता, पण अचानक त्याची तब्येत खालावली आणि तो कोसळला.
पोलिसांनी सूरजचा मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी सेलम शासकीय मोहन कुमारमंगलम मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये पाठवला आहे. "शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल," असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील चौकशी सुरू आहे.