"भाजप लोकांना मासे, मांस आणि अंडी..."; पश्चिम बंगालच्या प्रचारसभेतून ममता बॅनर्जी यांचा जोरदार हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2026 16:37 IST2026-03-29T16:37:28+5:302026-03-29T16:37:57+5:30
"भाजपला लोकांच्या खाण्यापिण्यावर नियंत्रण मिळवायचे असून, ते लोकांना मासे, मांस आणि अंडी खाण्यापासून रोखू इच्छित आहे," असा घणाघाती आरोप त्यांनी यावेळी केला. भाजपचा कोणत्याही धर्मावर विश्वास नसल्याचेही त्या यावेळी म्हणाल्या.

"भाजप लोकांना मासे, मांस आणि अंडी..."; पश्चिम बंगालच्या प्रचारसभेतून ममता बॅनर्जी यांचा जोरदार हल्ला
पश्चिम बंगालमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून, राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. आज मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुरुलिया येथील जाहीर सभेत भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्ला चढवला. "भाजपला लोकांच्या खाण्यापिण्यावर नियंत्रण मिळवायचे असून, ते लोकांना मासे, मांस आणि अंडी खाण्यापासून रोखू इच्छित आहे," असा घणाघाती आरोप त्यांनी यावेळी केला. भाजपचा कोणत्याही धर्मावर विश्वास नसल्याचेही त्या यावेळी म्हणाल्या.
भाजपशासित राज्यांमधील परिस्थितीवर बोट ठेवताना ममता म्हणाल्या, "त्या राज्यांमध्ये दंगली होतात, आदिवासींचे शोषण केले जाते आणि महिलांवर हल्ले होतात. भाजपच्या एका मोठ्या नेत्याने तृणमूल काँग्रेसविरोधात आरोपपत्र प्रसिद्ध केल्याचा संदर्भ देत त्या म्हणाल्या, "खरी चार्जशीट तर भाजपविरोधात असायला हवी." यावेळी त्यांनी गुजरातमध्ये झालेल्या दंगलींचा उल्लेख करून भाजपच्या कार्यपद्धतीवर कडाडून टीका केली.
VIDEO | West Bengal Chief Minister Mamata Banerjee says, "A big BJP leader has unleashed his ‘chargesheet’ against TMC; a ‘chargesheet’ should be filed against them. There were so many riots in Gujarat."
— Press Trust of India (@PTI_News) March 29, 2026
(Source: Third Party)
(Full video available on PTI Videos -… pic.twitter.com/hf9TBZz6vU
दरम्यान, पश्चिम बंगालमधील २९४ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान २३ एप्रिल रोजी, तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान २९ एप्रिल २०२६ रोजी पार पडेल. तर निकाल ४ मे रोजी जाहीर होणार आहे. यावेळच्या निवडणुकीत सुमारे ७ कोटी मतदार आपला हक्क बजावणार असून, त्यात ३.६ कोटी पुरुष आणि ३.४ कोटी महिला मतदारांचा समावेश आहे. याशिवाय, १४०२ ट्रान्सजेंडर मतदारही आहेत. २०२१ च्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने २१५ जागा जिंकून निर्भेळ यश मिळवले होते, तर भाजपला ७७ जागांवर समाधान मानावे लागले होते. या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा कंबर कसली असून बंगालचे राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे.
विशेष म्हणजे, यावेळची निवडणूक अनेक कारणांनी महत्त्वाची ठरत आहे. मतदार यादीच्या पुनरीक्षणानंतर (SIR) सुमारे ६३ लाख ६६ हजार मतदारांची नावे वगळण्यात आली असून, ६० लाखांहून अधिक नावे अद्याप चौकशीच्या फेऱ्यात आहेत.