ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 19:27 IST2025-10-07T19:21:26+5:302025-10-07T19:27:38+5:30
भाजप खासदारावर झालेल्या हल्ल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली.

ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
CM Mamata Banerjee meets BJP MP Khagen Murmu in ICU:पश्चिम बंगालमध्ये भाजप खासदार खगेन मुर्मू यांच्यावरील हल्ल्याचे प्रकरण वाढतच चालले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजप खासदार खगेन मुर्मू यांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. या भेटीनंतर ममता बॅनर्जी यांनी काळजी करण्यासारखे काहीही नसल्याचे म्हटलं. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यावेळी डॉक्टरांना त्यांचे पूर्ण लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत जेणेकरून ते लवकर बरे होतील. दुसरीकडे, अनेक केंद्रीय मंत्र्यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. तसेच लोकसभा सचिवालयाने यासंदर्भात गृह मंत्रालयाला पत्र लिहिले आहे.
उत्तर बंगालमधील पूर आणि भूस्खलनग्रस्त भागाला भेट देत असताना नगरकाटा येथे भाजप खासदार खगेन मुर्मू यांच्यावर हल्ला झाला होता. उत्तर बंगालमधील पूर आणि भूस्खलनग्रस्त भागांना भेट देण्यासाठी गेलेले खगेन यांच्यावर नागरकाटा येथे दगडफेक करण्यात आली. भाजप आमदार शंकर घोष यांच्यावरही जमावाने हल्ला केला. घोष यांनी आरोप केला की सत्ताधारी तृणमूल काँग्रेसशी संबंधित स्थानिकांनी लाथा, बुक्क्या मारल्या आणि दगडफेक केली. या हल्ल्यात खगेन मुर्मू यांना झालेल्या गंभीर दुखापती झाल्या. खगेन यांच्या डोळ्याखालील हाड तुटण्यासह चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाली आहे. ते सध्या आयसीयूमध्ये आहेत, असं त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले.
या घटनेनंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यांनी खगेन मूर्मू यांची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. भाजप खासदाराला भेटल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी जास्त आहे आणि ती नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले. "त्यात काही गंभीर नाहीये. त्यांना मधुमेह आहे. मी त्यांचा रिपोर्ट पाहिला आहे आणि त्यांच्या कानाच्या मागे किरकोळ दुखापत आहे. मी डॉक्टरांशी बोलले आहे. उच्च मधुमेहामुळे ते डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आहेत. मी ते लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देते," असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.
VIDEO | Siliguri: West Bengal CM Mamata Banerjee (@MamataOfficial) speaks to the media after visiting BJP MP Khagen Murmu in hospital.
— Press Trust of India (@PTI_News) October 7, 2025
She says, “He is diabetic, but there is nothing very serious. I have also spoken to the doctors. He is under observation due to diabetes. I… pic.twitter.com/ivSKnucp5l
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी या हल्ल्याबद्दल तृणमूल काँग्रेसवर टीका केली. राज्य सरकार आणि तृणमूल काँग्रेसने अशा आव्हानात्मक परिस्थितीत हिंसाचार करण्यापेक्षा लोकांना मदत करण्यावर अधिक लक्ष केंद्रित करावे अशी इच्छा आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. दुसरीकडे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधानांवर नैसर्गिक आपत्तीचे राजकारण करण्याचा आरोप केला. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.