"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 18:43 IST2025-11-01T18:42:11+5:302025-11-01T18:43:51+5:30
Rss Mallikarjun Kharge: काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्याची मागणी केली. त्याला आरएसएसचे दत्तात्रय होसबळे यांनी उत्तर दिले.

"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
RSS on Mallikarjun Kharge News: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्या विधानावर संताप व्यक्त केला. "कुणाला तरी वाटते म्हणून बंदी घातली जाऊ शकत नाही. आजच्या समाजाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला स्वीकारले आहे. अशा काळात बंदी घालण्याचे विधान करणे चुकीचे आहे", असा पलटवार होसबळे यांनी केला.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्याबद्दल विधान केले होते. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती दिनी बोलताना खरगे म्हणाले होते की, 'वल्लभभाई पटेल यांनी आरएसएसवर बंदी घातली होती.'
समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी मांडलेल्या भूमिकेवर बोलताना मल्लिकार्जून खरगे संघाबद्दल बोलले होते. "माझे व्यक्तिगत मत असे आहे की, आरएसएसवर बंदी घातली गेली पाहिजे. कारण देशातील कायदा आणि सुव्यवस्थेतील समस्या भाजप आणि आरएसएसच्या जन्मामुळे निर्माण झालेल्या आहेत."
दत्तात्रय होसबळे म्हणाले, "मल्लिकार्जून खरगे यांनी इतिहासातून धडा घ्यावा. कुणाची तरी इच्छा आहे म्हणून बंदी घातली जाऊ शकत नाही. समाजाने आरएसएसला स्वीकारले आहे. असे विधान करणे चुकीचे आहे."