"प्रेम आमच्याशी अन् लग्न मोदींशी"; खर्गे यांनी देवेगौडांना चिमटा काढताच PM मोदींनाही हसू आवरले नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 14:43 IST2026-03-18T14:28:58+5:302026-03-18T14:43:05+5:30
राज्यसभेत निरोपाच्या भाषणात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आपला अनुभव मांडला.

"प्रेम आमच्याशी अन् लग्न मोदींशी"; खर्गे यांनी देवेगौडांना चिमटा काढताच PM मोदींनाही हसू आवरले नाही
Mallikarjun Kharge on PM Narendra Modi: राज्यसभेत आज आपला कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या ३७ खासदारांना निरोप देण्यात येत आहे. विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी आपल्या ५४ वर्षांच्या संसदीय अनुभव मांडताना माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्याबाबत असं काही विधान केलं की, स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही आपले हसू आवरता आले नाही.
देवेगौडांच्या 'राजकीय लग्ना'ची चर्चा
आपल्या भाषणादरम्यान खर्गे यांनी एच. डी. देवेगौडांसोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. ते मिश्किलपणे म्हणाले, "मी देवेगौडाजींना गेल्या ५४ वर्षांपासून ओळखतो. आम्ही अनेक वर्षे एकत्र काम केले. पण नंतर काय झाले कुणास ठाऊक त्यांनी प्रेम आमच्याशी केले आणि लग्न मात्र मोदी साहेबांशी केले." खर्गे यांच्या या विधानानंतर संपूर्ण सभागृहात हसू फुटलं. समोर बसलेले पंतप्रधान मोदी आणि इतर खासदारही या फटकेबाजीवर मनमोकळेपणाने हसताना दिसले. सोशल मीडियावर सध्या हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
'सार्वजनिक जीवनात रिटायरमेंट नसते'
निरोप घेणाऱ्या खासदारांबद्दल बोलताना खर्गे भावूक झाले होते. "निरोपाचा शब्द उच्चारला की मन जड होते. पण सार्वजनिक जीवनात काम करणारा माणूस कधीच रिटायर होत नाही आणि कधी टायर्ड ही नसतो. ५४ वर्षांनंतरही मला आजही शिकण्याची गरज वाटते, कारण कोणताही माणूस पूर्णज्ञानी नसतो," असेही खर्गे यांनी म्हटलं.
आठवलेंच्या कविता आणि सहकाऱ्यांचे कौतुक
खर्गे यांनी आपल्या भाषणात रामदास आठवले यांच्या खास शैलीचाही उल्लेख केला. "आठवलेजी त्यांच्या कवितांसाठी ओळखले जातात आणि त्यांच्या कविता बहुतेकदा पंतप्रधान मोदींवरच केंद्रित असतात," असे ते हसत म्हणाले. तसेच शक्ती सिंह गोहिल, नीरज डांगी आणि फुलोदेवी नेताम यांच्या संसदीय कार्याचे त्यांनी भरभरून कौतुक केले.
संसदीय लोकशाहीवर भाष्य
सभागृहाच्या कामकाजावर बोलताना खर्गे यांनी संयम आणि सहकार्याचा सल्ला दिला. "सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संवाद असणे गरजेचे आहे. अंतर वाढले की गैरसमज वाढतात, जे संसदीय लोकशाहीसाठी हिताचे नाही," असे मत त्यांनी व्यक्त केले.
पंतप्रधान मोदींकडूनही कौतुक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही निरोप घेणाऱ्या सदस्यांचे आभार मानले. "देवेगौडाजी, खर्गेजी आणि शरद पवारजी यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांचे आयुष्य संसदीय कार्यप्रणालीत गेले आहे. त्यांच्या अनुभवातून नवीन खासदारांनी शिकण्यासारखे खूप काही आहे. समाजाप्रती समर्पण करण्याची वृत्ती या ज्येष्ठांकडून घ्यावी," असं पंतप्रधान मोदी म्हणाले.