भांडणाचे नाटक अन् तितक्यात पोलिसांवर गोळीबार! जम्मूत दोन पाकिस्तानी नागरिकांसह ३ कैदी पळाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 23:46 IST2026-02-16T23:38:26+5:302026-02-16T23:46:53+5:30

जम्मूत पोलिसांवर गोळीबार करुन तीन कैदी फरार झाल्याची घटना समोर आली आहे.

Major Jailbreak in Jammu Two Pakistani Nationals Among 3 Fugitives After Shooting at Police | भांडणाचे नाटक अन् तितक्यात पोलिसांवर गोळीबार! जम्मूत दोन पाकिस्तानी नागरिकांसह ३ कैदी पळाले

भांडणाचे नाटक अन् तितक्यात पोलिसांवर गोळीबार! जम्मूत दोन पाकिस्तानी नागरिकांसह ३ कैदी पळाले

Jammu Juvenile Jail Break: जम्मू-काश्मीरमधील आर.एस. पुरा सेक्टरमध्ये सोमवारी संध्याकाळी एका अत्यंत धक्कादायक जेल ब्रेकची घटना घडली आहे. जम्मू येथील बाल सुधारगृहात बंद असलेल्या दोन पाकिस्तानी नागरिकांसह तीन कैद्यांनी सुरक्षा रक्षक असलेल्या पोलिसांवर गोळीबार करून पलायन केले. या हल्ल्यात दोन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले असून त्यांची मृत्यूशी झुंज सुरू आहे.

सोमवारी संध्याकाळी ५:१५ च्या सुमारास ही घटना घडली. बाल सुधारगृहात काही किरकोळ वाद सुरू असल्याचे भासवून कैद्यांनी पोलिसांचे लक्ष विचलित केले. संधी मिळताच, या कैद्यांनी कर्तव्यावर असलेल्या पोलिसांवर अचानक हल्ला केला. धक्कादायक बाब म्हणजे, या कैद्यांकडे पिस्तूल होते. त्यांनी अंधाधुंध गोळीबार केला, ज्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या गोळीबारात एस.पी.ओ. विनय कुमार आणि हेड कॉन्स्टेबल परवीन कुमार हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी तातडीने जीएमसी जम्मू येथे दाखल करण्यात आले आहे.

पलायन केलेल्या तीन कैद्यांमध्ये दोन पाकिस्तानी नागरिकांचा समावेश असल्याने सुरक्षा यंत्रणांच्या चिंतेत भर पडली आहे. अहसान अनवर आणि मोहम्मद सनाउल्लाह हे दोघेही पाकिस्तानचे रहिवासी आहेत. तर करनजीत सिंह उर्फ गुग्गा हा स्थानिक रहिवासी आहे.

पिस्तूल आली कुठून? सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह

बाल सुधारगृहासारख्या संवेदनशील ठिकाणी कैद्यांकडे पिस्तूल पोहोचल्याने खळबळ उडाली आहे. सीसीटीव्हीमध्ये एक कैदी पिस्तुलातून गोळ्या झाडताना स्पष्टपणे दिसत आहे. ही पिस्तूल त्यांना कुणी पुरवली आणि आतमध्ये सुरक्षा तपासणीत इतकी मोठी चूक कशी झाली, याचा तपास आता पोलीस करत आहेत.

कठुआमध्ये जैशच्या ५ दहशतवाद्यांमुळे अलर्ट

एकीकडे हे तीन कैदी फरार झाले असतानाच, दुसरीकडे कठुआ जिल्ह्यात जैश-ए-मोहम्मदच्या ५ दहशतवाद्यांची घुसखोरी झाल्याची माहिती समोर आली आहे. सुरक्षा दलांनी या ५ दहशतवाद्यांची छायाचित्रे जारी केली असून लोकांन सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. फरार कैदी या दहशतवाद्यांच्या संपर्कात तर नाहीत ना, या दृष्टीनेही तपास केला जात आहे.

मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू

घटनेनंतर संपूर्ण जम्मू विभागात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. फरार कैद्यांना पकडण्यासाठी विशेष पथकांचे नेमण्यात आली असून, सीमावर्ती भाग आणि संशयित ठिकाणांवर छापेमारी सुरू आहे. जम्मू पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, संशयित व्यक्ती आढळल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्यावी, माहिती देणाऱ्याची ओळख गुप्त ठेवली जाईल.

Web Title : जम्मू जेलब्रेक: गोलीबारी के बाद पाकिस्तानी नागरिकों सहित कैदी फरार

Web Summary : जम्मू में, दो पाकिस्तानी नागरिक और एक अन्य कैदी पुलिस पर गोलीबारी के बाद एक किशोर जेल से भाग गए। दो अधिकारी गंभीर रूप से घायल हैं। कैदियों को पिस्तौल कैसे मिली, इसकी जांच चल रही है। सुरक्षा बढ़ा दी गई है और तलाशी जारी है।

Web Title : Jammu Jailbreak: Pakistani Nationals Among Inmates Escape After Shooting

Web Summary : In Jammu, two Pakistani nationals and another inmate escaped a juvenile jail after shooting at police. Two officers are critically injured. Investigations are underway to determine how the inmates acquired a pistol. Security has been heightened, and a search is ongoing.