बांगलादेशी गुप्तचर यंत्रणेचा प्रमुख दिल्लीत; भारताच्या राजधानीत १ ते ३ मार्च काळात काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 16:43 IST2026-03-11T16:42:49+5:302026-03-11T16:43:21+5:30
२ मार्चला दोन्ही देशांच्या गुप्तचर प्रमुखांची डिनर डिप्लोमसी झाली. ज्यात गुप्त माहिती शेअर करण्यासोबत सुरक्षेच्या दृष्टीने सविस्तर चर्चा करण्यात आली.

बांगलादेशी गुप्तचर यंत्रणेचा प्रमुख दिल्लीत; भारताच्या राजधानीत १ ते ३ मार्च काळात काय घडलं?
नवी दिल्ली - बांगलादेशात नवीन सरकार आल्यानंतर भारतासोबत जुने संबंध पुन्हा रुळावर आणण्याची तयारी सुरू झाली आहे. अंतरिम सरकारचे प्रमुख सल्लागार मोहम्मद युनूस यांच्या कार्यकाळात भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंधात कटुता आली होती. मात्र दोन्ही देशातील संबंध सुधारण्यासाठी बांगलादेशच्या गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख भारत दौऱ्यावर आले होते. मेजर जनरल कैसर राशिद चौधरी यांनी १ ते ३ मार्च या काळात दिल्ली दौरा केला. तारीक रहमान पंतप्रधान झाल्यानंतर ही पहिलीच वेळ आहे जेव्हा बांगलादेश सरकारमधील एक वरिष्ठ अधिकारी दिल्ली दौऱ्यावर आले आहेत.
रिपोर्टनुसार, राशिद चौधरी यांनी १ ते ३ मार्च या काळात दिल्ली दौरा केला. यावेळी भारतातील बाह्य गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख पराग जैन आणि मिलिट्री इंटेलिजेंसचे महासंचालक लेफ्टिनंट जनरल आर.एस रमन यांची त्यांनी भेट घेतली. २२ फेब्रुवारीला पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्यानंतर तारीक रहमान यांनी ब्रिगेडिअर जनरल राशिद यांना पदोन्नती देत मेजर जनरल बनवले आणि त्यांच्याकडे गुप्तचर यंत्रणेची जबाबदारी सोपवली.
२ मार्चला दोन्ही देशांच्या गुप्तचर प्रमुखांची डिनर डिप्लोमसी झाली. ज्यात गुप्त माहिती शेअर करण्यासोबत सुरक्षेच्या दृष्टीने सविस्तर चर्चा करण्यात आली. बांगलादेशात भारतविरोधी हालचालींबाबत गंभीर सुरक्षा चिंता भारताने व्यक्त केली. या कारवायांना सामोरे जाण्यासाठी बांगलादेशातील नवीन सरकारसोबत भारताला संबंध सुधारायचे आहेत. मोहम्मद युनूस यांच्या कार्यकाळात बांगलादेशात कायदा सुव्यवस्थेची स्थिती बिघडली होती. भारतासोबतचे संबंधही ताणले गेले होते. त्यामुळे पुढील काही आठवडे अथवा महिन्यात सुरक्षेच्या मुद्द्यावर हे दोन्ही देश कसे पुढे जातात याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.
दरम्यान, या भेटीनंतर ८ मार्च रोजी बांगलादेशातील राजकीय कार्यकर्त्या शरीफ उस्मान बिन हादी यांच्या हत्येतील आरोपी असलेल्या २ बांगलादेशी नागरिकांना पश्चिम बंगालमधील बोंगाव परिसरात अटक केली. १८ डिसेंबर २०२५ रोजी सिंगापूरच्या एका हॉस्पिटलमध्ये हादी यांचा मृत्यू झाला होता. १२ डिसेंबरला ढाका येथे त्यांच्यावर गोळी झाडण्यात आली होती. २०२४ च्या बांगलादेशातील आंदोलनात उस्मान बिन हादी विद्यार्थी नेता म्हणून पुढे आले होते. त्यांच्या आंदोलनामुळे शेख हसीना यांना पंतप्रधानपदावरून पायउतार व्हावे लागले होते.