Indian Coast Guard: भारताने आंतरराष्ट्रीय तेल तस्करी आणि बेकायदेशीर व्यापाराविरोधात आतापर्यंतचे सर्वात मोठे पाऊल उचलले आहे. भारतीय तटरक्षक दलाने मुंबई किनारपट्टीपासून १०० नॉटिकल मैल दूर अरबी समुद्रात संशयास्पद हालचाली करणाऱ्या तीन तेल टँकर्सना जप्त केले. ही तिन्ही जहाजे अमेरिकेने प्रतिबंधित केलेल्या यादीतील असून त्यांचा संबंध इराणशी असल्याचे उघड झाले आहे.
६ फेब्रुवारी रोजी भारतीय तपास यंत्रणांना भारताच्या क्षेत्रात काही संशयास्पद हालचाली दिसून आल्या. मुंबईपासून साधारण १०० सागरी मैल पश्चिमेला हे तीन टँकर्स एकमेकांमध्ये तेल हस्तांतरण करत असल्याचे निदर्शनास आले. ही पद्धत सहसा तेलाचा मूळ स्रोत लपवण्यासाठी वापरली जाते. तटरक्षक दलाने तातडीने कारवाई करत या तिन्ही जहाजांना ताब्यात घेतले आणि पुढील तपासासाठी मुंबई बंदरात आणले.
स्टेलर रूबी या जहाजावर इराणचा झेंडा होता. तर एस्फाल्ट स्टार हे जहाज मुख्यत्वे चीनच्या समुद्री मार्गावर सक्रिय होते. अल जाफझिया या जहाजाने २०२५ मध्ये इराणमधून जिबूतीपर्यंत इंधन नेल्याची नोंद आहे.
ओळख लपवण्यासाठी कॅमेलिअन पद्धत
हे तिन्ही जहाजे शैडो फ्लीट म्हणून काम करत होती. तपासणीत असे समोर आले की, ही जहाजे पकडले जाऊ नये म्हणून वारंवार आपली ओळख, नाव आणि कोणत्या देशाचा झेंडा लावायचा, हे बदलत असत. अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाने ज्या आयएमओ क्रमांकाच्या जहाजांवर बंदी घातली होती, तेच क्रमांक या जप्त केलेल्या जहाजांशी जुळत आहेत.
इराणचा संबंधांपासून नकार
दुसरीकडे, इराणच्या नॅशनल इराणी ऑईल कंपनीने या प्रकरणातून हात झटकले आहेत. जप्त करण्यात आलेली जहाजे किंवा त्यातील तेलसाठा आमचा नाही, असा दावा इराणने केला आहे. मात्र, शिपिंग डेटा आणि अमेरिकन इंटेलिजन्सनुसार या जहाजांचे धागेदोरे इराणशीच जुळलेले आहेत.
समुद्रात हाय अलर्ट; ५५ जहाजे तैनात
भारताची ही कारवाई अत्यंत महत्त्वाच्या वेळी झाली आहे. ज्या दिवशी भारत आणि अमेरिकेने अंतरिम व्यापार करारावर स्वाक्षरी केली, त्याच दिवशी ही कारवाई करण्यात आली. या घटनेनंतर भारतीय तटरक्षक दलाने समुद्रात कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. भारताच्या समुद्री हद्दीचा वापर बेकायदेशीर कृत्यांसाठी होऊ नये, यासाठी ५५ जहाजे आणि १० ते १२ विमाने २४ तास गस्त घालत आहेत.
Web Summary : Indian Coast Guard seized three Iranian oil tankers near Mumbai for illegal oil transfer. The ships, linked to Iran and sanctioned by the US, were using deceptive tactics to hide their origin. India heightened maritime security after the seizure.
Web Summary : भारतीय तटरक्षक बल ने मुंबई के पास अवैध तेल हस्तांतरण के लिए तीन ईरानी तेल टैंकरों को जब्त किया। अमेरिका द्वारा प्रतिबंधित जहाज अपनी उत्पत्ति छिपाने के लिए भ्रामक रणनीति का उपयोग कर रहे थे। जब्ती के बाद भारत ने समुद्री सुरक्षा बढ़ाई।