तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 18:44 IST2025-10-02T18:41:08+5:302025-10-02T18:44:25+5:30
Tamilnadu News: गुरुवारी विजयादशमीच्या मुहुर्तावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा १०० वा वर्धापन दिन साजरा होत आहे. तसेच देशभरात संघ स्वयंसेवकांकडून अनेक कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं आहे. याचदरम्यान, तामिळनाडूमध्ये मोठा वाद उफाळून आला आहे.

तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण
गुरुवारी विजयादशमीच्या मुहुर्तावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा १०० वा वर्धापन दिन साजरा होत आहे. तसेच देशभरात संघ स्वयंसेवकांकडून अनेक कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं आहे. याचदरम्यान, तामिळनाडूमध्ये मोठा वाद उफाळून आला आहे. तामिळनाडूमधी पोरूर येथे संघाच्या ३९ स्वयंसेवकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. एका सरकारी शाळेत विनापरवानगी पूजा आणि विशेष शाखा प्रशिक्षण आयोजित केल्याच्या आरोपाखाली संघाच्या या स्वयंसेवकांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
या कारवाईबाबत पोलिसांनी सांगितले की, संघाच्या या स्वयंसेवकांनी अय्यप्पनथंगल सरकारी उच्च माध्यमिक शाळेमध्ये विनापरवानगी गुरूपूजा आणि विशेष शाखा प्रशिक्षण सत्राचं आयोजन केलं होतं. त्यासाठी त्यांनी परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे या स्वयंसेवकांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या १०० व्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून केंद्र सरकारने एक विशेष टपाल तिकीट आणि एक विशेष नाणं प्रसिद्ध केलं होतं. केंद्र सरकारच्या या निर्णयावर तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी टीका केली होती. भारताच्या राष्ट्रपित्याची हत्या करणाऱ्या कट्टरतावादी स्वप्नांना आकार देणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतक महोत्सवानिमित्त देशाचं नेतृत्व टपाल तिकीट आणि नाणी प्रसिद्ध करत आहे. आपण देशाला या दयनिय स्थितीतून बाहेर काढलं पाहिजे, असे स्टॅलिन म्हणाले.