योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 18:37 IST2025-07-08T18:37:15+5:302025-07-08T18:37:38+5:30
Accident In Uttar Pradesh: उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये शिक्षणमंत्री असलेल्या गुलाब देवी यांच्या ताफ्याला मोठा अपघात झाला असून, ताफ्यातील वाहनांची एकमेकांना धकड बसून झालेल्या या अपघातात गुलाब देवी ह्या गंभीर जखमी झाल्या आहेत.

योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी
उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये शिक्षणमंत्री असलेल्या गुलाब देवी यांच्या ताफ्याला मोठा अपघात झाला असून, ताफ्यातील वाहनांची एकमेकांना धकड बसून झालेल्या या अपघातात गुलाब देवी ह्या गंभीर जखमी झाल्या आहेत. गुलाब देवी यांच्या वाहनांचा ताफा हा दिल्लीहून बिजनौरच्या दिशेने जात असताना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-९ वर पिलखुवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात झाला.
या अपघातामध्ये गुलाब देवी ज्या कारमधून प्रवास करत होत्या. त्या कारलासुद्धा धडक बसली. त्यामुळे गुलाब देवी यांनाही गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यासोबत असलेल्या सुरक्षा रक्षक आणि इतर व्यक्तींनाही दुखापत झाल्याचं वृत्त आहे. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मदत आणि बचाव कार्य सुरू केलं. मात्र मंत्रिमहोदयांच्या प्रकृतीबाबत कुठलंही अधिकृत मेडिकल बुलेटिन अद्याप प्रसिद्ध करण्यात आलेलं नाही.
गुलाब देवी ह्या उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये माध्यमिक शिक्षणमंत्री म्हणून कार्यरत आहेत. २०२२ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी सलग पाचव्यांदा विजय मिळवून विधानसभा गाठली होती. संभल जिल्ह्यातील चंदोसी विधानसभा मतदारसंघातून त्या विद्यमान आमदार आहेत. तसेच योगी सरकारमधील सर्वात वरिष्ठ महिला मंत्री आहेत.