"घटनात्मक पदाची गरिमा ठेवा"; न्यायमूर्ती शेखर कुमार यादवांचे SC कॉलेजियमने टोचले कान
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 11:01 IST2024-12-18T10:57:57+5:302024-12-18T11:01:09+5:30
Shekhar Kumar Yadav: वादग्रस्त भाषण प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने इलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शेखर कुमार यादव यांची कानउघाडणी केली.

"घटनात्मक पदाची गरिमा ठेवा"; न्यायमूर्ती शेखर कुमार यादवांचे SC कॉलेजियमने टोचले कान
Shekhar Kumar Yadav SC Collegium: विश्व हिंदू परिषदेच्या कार्यक्रमात बोलताना वादग्रस्त विधान केल्या प्रकरणी इलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शेखर कुमार यादव सर्वोच्च न्यायलयाच्या कॉलेजियमसमोर हजर झाले. सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्यासह पाच सदस्यीय कॉलेजियमने न्यायमूर्ती शेखर कुमार यादव यांचे कान टोचले. मंगळवारी (१७ डिसेंबर) न्यायमूर्ती यादव कॉलेजियमसमोर हजर झाले होते.
सरन्यायाधीश संजीव खन्ना, न्यायमूर्ती बी.आर. गवई, न्यायमूर्ती सूर्य कांत, न्यायमूर्ती ऋषिकेश रॉय आणि न्यायमूर्ती ओक यांचा समावेश असलेल्या कॉलेजियमसमोर न्यायमूर्ती शेखर कुमार यादव हे हजर झाले. सार्वजिनक कार्यक्रमात बोलताना तुमच्या घटनात्मक पदाची गरिमा ठेवा, अशा शब्दात न्यायमूर्ती यादव यांना कॉलेजियमने सुनावले.
न्यायमूर्ती यादवांनी कॉलेजियमसमोर काय दिले स्पष्टीकरण?
न्यायमूर्ती शेखर कुमार यादव मंगळवारी (१७ डिसेंबर) कॉलेजियमसमोर हजर झाले. त्यांनी कॉलेजियमला सांगितले की, 'माध्यमांनी अनावश्यक वाद निर्माण केला. माझ्या भाषणातून मोजकी विधाने घेऊन मांडली गेली.'
'न्यायमूर्तींची वर्तणूक बघितली जाते'
न्यायमूर्ती यादव यांच्या स्पष्टीकरणाबद्दल कॉलेजियमने स्वीकारले नाही आणि त्यांनी केलेल्या भाषणाबद्दल फटकारले. कॉलेजियम न्यायमूर्ती यादवांना म्हणाले की, 'संवैधानिक पदावर असल्याने आणि सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे वर्तणूक, व्यवहार आणि भाषण सतत बघितले जाते. त्यामुळे त्यांच्याकडून घटनात्मक पदाची गरिमा राखण्याची अपेक्षा केली जाते.'
सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या अध्यक्षतेखालील कॉलेजियमने न्यायमूर्ती यादव यांची चौकशी केली. कॉलेजियमने त्यांना प्रश्न विचारले. ४५ मिनिटं कॉलेजियमसमोर चौकशी सुरू होती. सूत्रांनी सांगितले की, न्यायमूर्ती यादव यांना पुन्हा चौकशीसाठी बोलवले जाऊ शकते.