कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 10:28 IST2025-11-07T10:18:16+5:302025-11-07T10:28:02+5:30
Maharashtra Local Body Election 2025: पुढील महिन्यात होणाऱ्या नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी राज्यातील सत्ताधारी महायुतीसह विरोधी पक्षातील महाविकास आघाडीमधील घटक पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. या निवडणुकीसाठी राज्यात स्थानिक पातळीवर नवनवी समिकरणं आकारास येत आहेत.

कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
पुढील महिन्यात होणाऱ्या नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी राज्यातील सत्ताधारी महायुतीसह विरोधी पक्षातील महाविकास आघाडीमधील घटक पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. या निवडणुकीसाठी राज्यात स्थानिक पातळीवर नवनवी समिकरणं आकारास येत आहेत. यादरम्यान, कोकणातून एक धक्कादायक बातमी समोर येत असून, कणकवली नगरपंयाचतीच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट हे एकत्र येऊन निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच त्यासाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये गुप्त बैठक झाल्याचेही वृत्त आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली नगरपंचायतीवरील सत्ता ही राणे कुटुंबीय आणि त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या वैभव नाईक यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे या नगरपंयातीवर वर्चस्व मिळवण्यासाठी पडद्यामागे अनेक घडामोडी सुरू आहेत. त्यातूनच राणे कुटुंबीय आणि भाजपाच्या वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी एकमेकांचे कट्टर राजकीय वैरी बनलेले शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट हे एकत्र येणार असल्याचा दावा केला जात आहे.
शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट तसेच कणकवली शहरातील इतर प्रतिष्ठित मंडळींची मिळून स्थानिक आघाडी करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक आणि हल्लीच शिंदे गटात गेलेले माजी आमदार राजन तेली यांची गुप्त बैठक झाल्याचं वृत्त आहे. तसेच या बैठकीला सुशांत नाईक, सतीश सावंत आणि संदेश पारकर हे उपस्थित होते असे सांगण्यात येत आहे. या आघाडीकडून संदेश पारकर यांचं नाव नगराध्यक्षपदासाठी पुढे करण्यात येणार आहे. तसेच ही आघाडी करण्याबाबतचा प्रस्ताव हा वरिष्ठांकडे पाठवण्यात आला आहे. त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाल्यानंतर आघाडीबाबत पुढील घडू शकतात.
दरम्यान, याबाबत एका वृत्तवाहिनीशी बोलताना शिवसेना शिंदे गटाचे नेते राजन तेली यांनी सांगितले की, कणकवलीमध्ये शहर विकास आघाडी करून एकत्र येण्याबाबत विचार सुरू असून, तसा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवण्यात आला आहे. या शहर विकास आघाडीमध्ये राजकीय पक्षांसह शहरातील इतर मंडळींचाही समावेश असेल. दरम्यान, वरिष्ठ पातळीवरून याबाबत जसा प्रतिसाद मिळेल, तशा पद्धतीने पुढील हालचाली केल्या जातील असेही राजन तेली यांनी सांगितले.