महाराष्ट्रात घराणेशाहीचे 'राजकारण' सर्वाधिक; यूपी, बिहारमध्येही 'गादी' चालवणारे जास्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 12:41 IST2025-10-29T12:36:57+5:302025-10-29T12:41:39+5:30
महाराष्ट्रातील एकूण ४३३ खासदार आणि आमदारांपैकी तब्बल १०८ जण घराणेशाहीतून राजकारणात

महाराष्ट्रात घराणेशाहीचे 'राजकारण' सर्वाधिक; यूपी, बिहारमध्येही 'गादी' चालवणारे जास्त
नवी दिल्ली: घराणेशाहीला निवडणुकीचा मुद्दा बनवणाऱ्या पक्षांचेच त्याच दलदलीत पाय अडकलेले दिसत आहेत. आतापर्यंत उत्तर भारतात राजकारणात घराणेशाही अधिक असल्याचे मानले जात होते; मात्र देशभरातील विद्यमान खासदार आणि आमदारांचा अभ्यास केल्यानंतर महाराष्ट्र यामध्ये सर्वात पुढे असल्याचे चित्र समोर आले आहे.
महाराष्ट्रातील एकूण ४३३ खासदार आणि आमदारांपैकी तब्बल १०८ जण घराणेशाहीतून राजकारणात आलेले आहेत म्हणजेच जवळपास २५ टक्के प्रतिनिधी 'घराणेशाही'तून पुढे आलेले आहेत. यानंतर उत्तर प्रदेशचा क्रमांक लागतो. तिथे ६१३ खासदार आणि आमदारांपैकी १३३ (२१.६९ टक्के) आणि बिहारमध्ये ३७४ पैकी ८९ (२३.७९ टक्के) प्रतिनिधी घराणेशाहीशी संबंधित आहेत.
भाजपचे ३८७ तर काँग्रेसचे २८५ नेते घराणेशाहीतले ?
पक्षनिहाय पाहता, भारतीय जनता पक्षाकडे घराणेशाहीतून आलेल्या आमदार-खासदारांची सर्वाधिक संख्या म्हणजेच ३८७ आहे. परंतु त्यांच्या एकूण लोकप्रतिनिधींपैकी हे प्रमाण फक्त १८.६२ टक्के इतके आहेत. दुसरीकडे, काँग्रेसमध्ये घराणेशाहीतून आलेल्या प्रतिनिधींचे प्रमाण भाजपच्या तुलनेत बरेच जास्त आहे. काँग्रेसच्या ८५७ प्रतिनिधींपैकी २८५ जण म्हणजेच ३३.२५ टक्के घराणेशाहीतून आले आहेत. सपात हे प्रमाण ३४.८१ टक्के असून, त्यानंतर जनता दल (यु) ३४.५७ टक्के आहे.

गांधींवरच टीका
काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी या राज्यसभेच्या खासदार आहेत, सोनिया गांधी या दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पत्नी तर दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या स्नुषा होत. त्यांचे पुत्र म्हणजेच राहुल गांधी रायबरेली लोकसभा मतदार संघाचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते आहेत. तर त्यांची मुलगी खासदार प्रियांका गांधी या ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या महासचिव आहेत. तसेच हे तिघेजण कॉंग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्यही आहेत. नेहरूंपासून सुरू असलेल्या परंपरेमुळे राजकारणातील घराणेशाहीत गांधी यांचे कुटुंब वरच्या स्थानी असल्याची टीका सातत्याने केली जाते.