Maharashtra Government: Congress is in trouble in Maharashtra if no government is formed | Maharashtra Government: सेनेसह सरकार स्थापन न केल्यास महाराष्ट्रात काँग्रेस अडचणीत
Maharashtra Government: सेनेसह सरकार स्थापन न केल्यास महाराष्ट्रात काँग्रेस अडचणीत

नवी दिल्ली : शिवसेनेसोबत सरकार स्थापन न केल्यास काँग्रेसचे महाराष्ट्रातून अस्तित्व नष्ट होईल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना ठामपणे सांगितले. त्यामुळे सोमवारी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत सोनिया गांधी यांना आपला शिवसेनाविरोध गुंडाळून ठेवावा लागला.
काँग्रेसच्या आमदारांनाही सत्तेत सहभागी व्हायची इच्छा आहे, असे त्या पक्षाचे महाराष्ट्रातील नेते पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे यांनी सोनिया गांधींना सांगितले. महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. तिथे सरकार कोणी बनवावे, याबाबत अद्याप गोंधळच सुरू आहे. त्यात इतर पक्षांकडून फोडाफोडीचे प्रयत्न होऊ नयेत म्हणून काँग्रेसच्या महाराष्ट्रातील आमदारांना गेले काही दिवस राजस्थानातील जयपूर येथे ठेवण्यात आले होते.
महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी केलेल्या युक्तिवादाला काँग्रेस कार्यकारिणीतील ए.के. अ‍ॅन्टोनी, मुकुल वासनिक, शिवराज पाटील आदी ज्येष्ठ नेत्यांनी जोरदार विरोध केला. शिवसेना कट्टर हिंदुत्ववादी संघटना असून, तिच्याशी काँग्रेसचे कधीच पटणे शक्य नाही, असे या नेत्यांचे म्हणणे होते. कर्नाटकमध्ये समविचारी असूनही जनता दल (एस)सोबत काँग्रेसने केलेली आघाडी अखेर फसली. कुमारस्वामी यांचे सरकार कोसळले, याकडे काँग्रेसचे सरचिटणीस के. वेणुगोपाल यांनी सोनिया गांधींबरोबरच्या बैठकीत लक्ष वेधले. अ‍ॅन्टोनी व वेणुगोपाल यांनी सोनिया गांधींची मंगळवारी सकाळी पुन्हा भेट घेऊन महाराष्ट्रातील स्थितीबाबत चर्चा केली.
महाराष्ट्रात शिवसेनेसोबत काँग्रेसने सरकार स्थापन केल्यास अल्पसंख्याक दुखावले जातील, अशी शंका माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सोनिया गांधी यांच्याबरोबरच्या बैठकीत व्यक्त केली होती. मात्र, सरकार स्थापन न केल्यास महाराष्ट्रातून काँग्रेसचे नामोनिशाण पुसले जाईल, असे मत राज्यातील बहुतेक काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केल्याने सोनियांनी शिवसेनाविरोध बाजूला ठेवला.
>शिवसेना करणार नाही याचिकेचा पाठपुरावा
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या निर्णयाविरोधात शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेचा पाठपुरावा न करण्याचे ठरविले आहे.
या याचिकेची सुनावणी बुधवारी सकाळी होणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, महाराष्ट्रातील नव्या आघाडीच्या बोलणीबाबत सुरू असलेल्या घडामोडी लक्षात घेऊन शिवसेनेतर्फे त्यासाठी न्यायालयास विनंतीच केली नाही.
>राष्ट्रपती राजवटीलाही आव्हान नाही
राष्ट्रपती राजवटीला आव्हान देण्याचेही शिवसेनेने ठरविले होते. ती याचिकाही तयार करण्यात आली होती. ती आता कधी सादर केली जाईल, वा केली जाणार का, हे सांगणे अवघड असल्याचे अ‍ॅड. फर्नाडिस म्हणाले.

Web Title: Maharashtra Government: Congress is in trouble in Maharashtra if no government is formed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.