'महंत नरेंद्र गिरी यांची सुसाईड नोट बनावट', बलवीर गिरी यांना उत्तराधिकारी करण्यास नकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2021 18:38 IST2021-09-22T18:36:14+5:302021-09-22T18:38:21+5:30
Mahant Narendra Giri Suicide: निरंजनी आखाड्याचे सचिव रवींद्र पुरी यांनी सुसाईड नोट बनावट असल्याचं सांगून उत्तराधिकारी घोषित करण्यास नकार दिलाय.

'महंत नरेंद्र गिरी यांची सुसाईड नोट बनावट', बलवीर गिरी यांना उत्तराधिकारी करण्यास नकार
प्रयागराज: महंत नरेंद्र गिरी यांच्या आत्महत्या प्रकरणात बुधवारी नवा ट्विस्ट आला आहे. प्रयागराज येथील पंच परमेश्वरच्या बैठकीत महंत नरेंद्र गिरी यांची सुसाईड नोट बनावट असल्याचं घोषित करण्यात आलंय. तसेच, त्यांच्या उत्तराधिकाऱ्याची घोषणा करण्यावरुनही वाद निर्माण झाला आहे.
निरंजनी आखाड्याचे सचिव रवींद्र पुरी यांनी सुसाईड नोट बनावट असल्याचं सांगून उत्तराधिकारी घोषित करण्यास नकार दिलाय. आता संत बालवीरांचा उत्तराधिकारी होण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आलाय. सभेची पुढील तारीख 25 सप्टेंबर जाहीर करण्यात येईल. रवींद्र पुरी यांनी बलवीर गिरी यांच्यावर कोणतेही आरोप केले नसले तरी, त्यांनी सुसाईड नोटच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे, बलवीर गिरी हे निरंजनी आखाड्याच्या पंच परमेश्वरचे सदस्यदेखील आहेत.
आखाडी परिषद करत आहे तपास
दरम्यान, आखाडा परिषदेकडून एक मोठं निवेदन आलं आहे. पोलिसांसह आता आखाडा परिषदही महंत नरेंद्र गिरी यांच्या मृत्यूची चौकशी करत आहे. आखाडा 16 दिवसांनी सोलसी भंडारा आयोजित करेल. आखाडा परिषदेकडून त्यानंतर तपासाबद्दल आणि मृत्यूबाबत माहिती दिली जाईल. आखाडा परिषदेचे म्हणणे आहे की 16 दिवसांनंतर सरकारी तपासाचे निकालही बाहेर येऊ लागतील.
नरेंद्र गिरी यांचा अंत्यविधी
आज अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष आणि बाघंब्री मठाचे प्रमुख महंत नरेंद्र गिरी यांचे पार्थिवाला त्यांच्या गुरुंच्या पुढे श्री मठ बाघंब्री गड्डीत मंत्र आणि विधींसह समाधी देण्यात आली. पद्मासन आसनात महंत नरेंद्र गिरी अनंतात विलीन झाले. आता वर्षभर ही समाधी कच्ची राहील. यावर शिवलिंगाची स्थापना करुन दररोज पूजा केली जाईल. यानंतर समाधीला काँक्रीटने पक्क केलं जाईल.