"महाकुंभमेळ्याचं नियोजन लष्कराकडे का दिलं नाही?", चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर प्रेमानंद पुरी भावूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 13:03 IST2025-01-29T13:00:21+5:302025-01-29T13:03:04+5:30

Prayagraj Mahakumbh Stampede : या घटनेबाबत बोलताना पंचायती आखाडा श्री निरंजनीचे महामंडलेश्वर प्रेमानंद पुरी भावूक झाले.

Mahakumbh Stampede : Mahamandaleshwar Premanand Puri Breaks Down Over Tragic Stampede at Kumbh Mela, Blames Why Didn’t Yogi Government Involve the Army? | "महाकुंभमेळ्याचं नियोजन लष्कराकडे का दिलं नाही?", चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर प्रेमानंद पुरी भावूक

"महाकुंभमेळ्याचं नियोजन लष्कराकडे का दिलं नाही?", चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर प्रेमानंद पुरी भावूक

Prayagraj Mahakumbh Stampede : प्रयागराज : महाकुंभमेळाव्यात आज मौनी अमावस्येला अमृत स्नान करण्यासाठी संगम किनाऱ्यावर मोठ्या संख्येने भाविक आले. यावेळी मंगळवारी रात्री चेंगराचेंगरीची घटना घडली. या चेंगराचेंगरीत अनेक जण जखमी झाले आहेत.तर दहा जणाचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, मृत्यूबाबत अद्याप अधिकृत आकडेवारी समोर आलेली नाही. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

या घटनेनंतर आता विविध प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत. या घटनेबाबत बोलताना पंचायती आखाडा श्री निरंजनीचे महामंडलेश्वर प्रेमानंद पुरी भावूक झाले. तसेच, त्यांनी कुंभमेळ्याच्या नियोजनावरून योगी आदित्यनाथ सरकारवर संताप व्यक्त केला. सरकारने कुंभमेळ्याचं नियोजन भारतीय लष्कराकडे का दिलं नाही? असा प्रश्न प्रेमानंद पुरी यांनी उपस्थित केला.

प्रेमानंद पुरी म्हणाले, आम्ही आधीच सांगितले होते की, कुंभमेळ्याची सुरक्षा लष्कराकडे सोपवावी, पण कोणीही आमचे ऐकले नाही. महाकुंभमेळा प्रशासकीय व्यवस्थेमळे कलंकित झाला आहे. इतके लोक येत असल्याने, ते हाताळण्याचे काम पोलिसांचे नाही. चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर मन दुखी झालं आहे. जर महाकुंभमेळ्याच्या सुरक्षेची जबाबदारी भारतीय लष्कराकडे दिली असती, तर आज ही घटना घडलीच नसती, असे म्हणत प्रेमानंद पुरी यांनी संताप व्यक्त केला.

अफवांकडे लक्ष देऊ नका - योगी आदित्यनाथ
या घटनेनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अफवांकडे लक्ष देऊ नका, असे आवाहन भाविकांना केले आहे. भाविकांनी अफवांकडे लक्ष देऊ नये, केंद्र आणि राज्य सरकार पूर्ण ताकदीने सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे. जर कोणी नकारात्मक अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला, तर त्यामुळे नुकसान होऊ शकते, असे योगी आदित्यनाथ म्हणाले. तसेच, काही भाविक गंभीर जखमी झाले आहेत आणि सुरक्षित स्नान सुनिश्चित करण्यासाठी प्रशासन सतत सक्रिय आहे. पहाटे १-२ वाजता भाविकांनी बॅरिकेड्स ओलांडून उड्या मारल्या. त्यावेळी ही घटना  घडली, असे योगी आदित्यनाथ म्हणाले.

कशी झाली दुर्घटना?
मौनी अमावस्येमुळे गंगा स्नान करण्यासाठी मंगळवारी रात्री २ वाजल्यापासून संगम किनाऱ्यावर भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. त्यावेळी सुरक्षेसाठी लावलेले बॅरिकेड्स तुटले आणि एकच गोंधळ उडाला. त्यामुळे दोन्ही बाजूने चेंगराचेंगरी झाली. काही मिनिटांत परिस्थिती चिघळली. लोक जीव वाचवण्यासाठी धावू लागले. काही भाविकांचे सामान खाली पडले. त्यात लोक एकमेकांना मागे सारून पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते. गर्दी नियंत्रणातून बाहेर गेल्याने चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
 

Web Title: Mahakumbh Stampede : Mahamandaleshwar Premanand Puri Breaks Down Over Tragic Stampede at Kumbh Mela, Blames Why Didn’t Yogi Government Involve the Army?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.