"महाकुंभ भारताच्या अध्यात्मिक वारशाचे प्रतीक"; महाकुंभाला सुरुवात, पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 09:56 IST2025-01-13T09:54:12+5:302025-01-13T09:56:48+5:30
PM Modi : पंतप्रधान मोदी यांनी महाकुंभाच्या उद्घाटनानंतर शुभेच्छा देत भाविकांचे अभिनंदन केले आहे.

"महाकुंभ भारताच्या अध्यात्मिक वारशाचे प्रतीक"; महाकुंभाला सुरुवात, पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा
Mahakumbh 2025: उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळाव्याला आजपासून सुरुवात झाली आहे. सोमवारपासून पहिल्या शाही स्नानाने कुंभ मेळ्याला सुरुवात झाली. पौष पौर्णिमेच्या मुहूर्तावर सुरू होणाऱ्या महाकुंभ मेळाव्याला मोठ्या प्रमाणात भाविकांनी हजेरी लावले आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी सर्व भाविक, संत, महात्मा, कल्पवासींचे स्वागत केले आणि महाकुंभाच्या पहिल्या स्नानासाठी शुभेच्छा दिल्या. महाकुंभ हा भारताच्या कालातीत अध्यात्मिक वारशाचे प्रतीक आहे, विश्वास आणि सौहार्दाचा उत्सव आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या सोशल मिडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे.
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील त्रिवेणी संगमात मोठ्या संख्येने भाविक पवित्र स्नान करत आहेत. पौष पौर्णिमेने ४५ दिवसीय महाकुंभ २०२५ सुरू झाला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवरुन पोस्ट करत महाकुंभासाठी आलेल्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. 'भारतीय मूल्ये आणि संस्कृती जपणाऱ्या करोडो लोकांसाठी हा दिवस खूप खास आहे! महाकुंभ २०२५ ची सुरुवात प्रयागराजमध्ये होत आहे, जी श्रद्धा, भक्ती आणि संस्कृतीच्या पवित्र संगमावर असंख्य लोकांना एकत्र आणेल. महाकुंभ हा भारताच्या कालातीत अध्यात्मिक वारशाचे प्रतीक आहे आणि विश्वास आणि सौहार्दाचा उत्सव आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.
"पौष पौर्णिमेला पवित्र स्नान करून प्रयागराज या पवित्र ठिकाणी आजपासून महाकुंभाला सुरुवात झाली आहे. आपल्या श्रद्धा आणि संस्कृतीशी संबंधित या दिव्य प्रसंगी, मी सर्व भक्तांना मनापासून नमस्कार आणि अभिनंदन करतो. भारतीय अध्यात्मिक परंपरेचा हा भव्य सण तुम्हा सर्वांच्या जीवनात नवीन ऊर्जा आणि उत्साह संचारेल अशी आमची इच्छा आहे," असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.
पौष पूर्णिमा पर पवित्र स्नान के साथ ही आज से प्रयागराज की पुण्यभूमि पर महाकुंभ का शुभारंभ हो गया है। हमारी आस्था और संस्कृति से जुड़े इस दिव्य अवसर पर मैं सभी श्रद्धालुओं का हृदय से वंदन और अभिनंदन करता हूं। भारतीय आध्यात्मिक परंपरा का यह विराट उत्सव आप सभी के जीवन में नई ऊर्जा…
— Narendra Modi (@narendramodi) January 13, 2025
बऱ्याच तयारीनंतर पौष पौर्णिमेला प्रयागराजमध्ये महाकुंभ २०२५ सुरू झाला. तीन पवित्र नद्यांच्या संगमावर जगातील सर्वात मोठा धार्मिक कार्यक्रम होत आहे. या धार्मिक कार्यक्रमात देश-विदेशातून कोट्यवधी लोक येत असून पवित्र त्रिवेणी संगमात स्नान करत आहेत. महाकुंभातील महत्त्वाच्या तारखांना अमृत स्नानाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे लाखो भाविकांनी स्नान करण्यास सुरुवात केली आहे. १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी या कालावधीत होत असलेल्या महाकुंभसाठी हजारो साधू-संत आणि जगभरातील लाखो भाविक प्रयागराजमध्ये दाखल झाले आहेत. पुढील दीड महिन्यात तब्बल ३५ कोटी भाविक येतील असा अंदाज व्यक्त करत उत्तर प्रदेश सरकारने त्यासंदर्भात तयारी केली आहे.
मुख्यमंत्री योगींनी दिल्या पौष पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या
महाकुंभाला सुरुवात झाल्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पौष पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. "तीर्थराज प्रयागराजमध्ये आजपासून जगातील सर्वात मोठा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक मेळावा महाकुंभ सुरू होत आहे. विविधतेतील एकता अनुभवण्यासाठी श्रद्धा आणि आधुनिकतेच्या संगमावर आध्यात्मिक साधना आणि पवित्र स्नानासाठी आलेल्या सर्व पूज्य संतांचे, कल्पवासींचे आणि भक्तांचे हार्दिक स्वागत आहे. आई गंगा तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो. प्रयागराज महाकुंभाच्या उद्घाटन आणि पहिल्या स्नानासाठी हार्दिक शुभेच्छा," असं योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.